Tuesday, May 14, 2013

तो सुधारलाय आता!

गेल्या वर्षी नात्यातल्या अगदी जवळच्या बहिणीचं लग्न झालं. तिचे यजमान अगदी दिलखुलास. त्यामुळे माझ्या छोट्याची (वय वर्ष ५) त्यांच्याशी चांगली दोस्ती झाली. काकाशी गप्पा मारणं, मावशीकडे फोनवर काका कसा आहे याची चौकशी करणं, हे सुरू झालं. वर्षभरात वेगवेगळ्या निमित्ताने गाठीभेटी होत राहिल्या.

मात्र या प्रत्येक वेळी काकाने आणि काकाच्या धाकट्या भावाने एक वाक्य बोलून अगदी सतावून सोडलं होतं, तो म्हणजे 'चल आमच्या घरी नेतो तुला.' लेकाने दरवेळी जमेल तशी उत्तरं देऊन तो प्रश्न टाळला होता. पुढे पुढे तर 'मस्ती केलीस तर आमच्या घरी नेईन हं' असं व्हायला लागलं. दरवेळच्या भेटीत हे वाक्य आणि त्यावर उत्तरं ही ठरलेली. प्रश्न विचारणार्‍या काकाची चिकाटी आणि उत्तर देणार्‍या लेकाचे पेशन्स!

नुकतंच एका सणाच्या निमित्ताने पुन्हा भेट झाली. यावेळी कसं कोण जाणे काकाने हा प्रश्न विचारला नाही. बाकी सगळ्या गप्पा झाल्या. जरावेळाने मावशीही घरी आली. तिने लेकाला विचारलं, "काय काका भेटला का? गप्पा मारल्यास का त्याच्याशी?" त्यावर त्याने त्या दोघांच्या काय काय गप्पा झाल्या ते सगळं सांगितलं.

मग काहीतरी आठवून तो म्हणाला, "मावशी, पण काका सुधारलाय हां आता.."

मावशी अवाक्, चकीत वगैरे! तिने विचारलं, "म्हणजे काय रे?"

त्यावर हा म्हणाला, "यावेळी घरी नेतो असं म्हणाला नाही मला..!"

काकासकट आम्ही सगळी हसून हसून लोटपोट.