Tuesday, June 9, 2020

नाव काय!

तुम्हाला तुमचं नाव आवडतं का? तुमचं नावाची किती मंडळी तुम्हाला माहीत आहेत?

माझं नाव योगिनी. तसं मला लहानपणी फारसं कोणी नावाने हाक मारत नव्हतं. घरचे मला मनू म्हणायचे. त्यांच्यामुळे शेजारचेसुद्धा. आत्या कधीतरी बाबी म्हणायची. शाळेत जायच्या वयात आल्यावर पाळणाघरात ठेवलं होतं. ते घर छानशा सुबक चाळीतलं. धुडगूस घालायला भरपूर मुलं होतो आम्ही. तिथला उमेशदादा मला ठकी म्हणायचा ते आठवतं. ते ठसकेदार नाव मी अगदी विशीतिशीची होईपर्यंत त्याच्या हक्काचं होतं.

तर मुद्दा काय की आपल्या नावाचा अर्थ काय, ते आपल्याला आवडतं का हे प्रश्न डोक्यात उगवायची गरजच पडली नाही पहिली दहा वर्षं. नंतर एकदा एका पुस्तकावर योगिनी जोगळेकर हे नाव वाचलं आणि एकदम कॅच्याकै भारी वाटलं. तोवर माझं नाव शेअर करणारं दुसरं कोणी मला भेटलं नव्हतं. भेटलं तेही थेट पुस्तकाच्या पानावर! मुदलात मी म्हणजे आमच्या घरातला वाचुकिडा. त्यामुळे पुस्तक हा बिनपायाचा प्राणी माझ्यासाठी एऽऽऽकदम स्पेशल. त्यावर माझं नाव... हे म्हणजे पॉटरहेडचं स्वतःचंच नाव हार्मोयिनी किंवा मग जोऍन असण्यासारखं होतं. अर्थातच माझं नाव माझ्यासाठी आवडणारं झालं. नंतर कधीच ते बदलायचं वगैरे नाही हे कदाचित तेव्हाच ठरलं असेल माझं.

मोठं झाल्यावर मनू-ठकी-बाबी सगळं मागे पडलं आणि सोबत राहिलं ते योगिनी. अगदी अनकॉमन असल्याकारणाने तिथून पुढेही बरीच वर्षं मला दुसरी योगिनी भेटली नाही. ना कॉलेजमध्ये, ना नोकऱ्यांमध्ये. एवढ्या वर्षांत फक्त दोन योगिनी प्रत्यक्षात ओळखीच्या झाल्या आहेत. एक मात्र व्हायचं, हे नाव कानावर पडलेलं नसल्याने बरेचजण नीट ओळख झाल्यावरही हळूचकन योगितावर घसरायचे. आणि मग तिथून पुढच्या बोलण्यात प्रत्येक वाक्याला माझ्या डोक्यात सारखं "मैं योगिता नहीं योगिनी हूं.." हा ट्रॅक वाजत राहायचा. अगदी त्यांना मध्येच थांबवून "दहा वेळा म्हणा बरं... यो गि नी!" असं सांगायचा ठसकाही लागायचा...पण काय करता!

तोवर अर्थबिर्थ प्रकरण फार काही मनावर घेतलं नव्हतं. लेखाच्या खाली वेगवेगळ्या फॉन्टमध्ये छापून येणारं योगिनी नेने बघायला मस्त वाटायचं, अजूनही वाटतं. MNC जॉईन केल्यावर कोण्या फिरंगीने विचारलंच तर it means a lady monk हे सांगून टाकायचे. एकदा बीपीओत नोकरी केली तेव्हा तिथे कामासाठी नाव बदललं जायचं त्यात मला यास्मिन (उच्चारी जॅस्मिन) हे नाव मिळालं. तेव्हा माझ्या बाजूला बसायचा तो कलीग आणि मी अजूनही फोनबुकमध्ये आणि प्रत्यक्षातसुद्धा एकमेकांसाठी गॅरी आणि जॅस्मिन राहिलोय. तेही मस्त सुगंधी नाव भारी आवडलं. चॉईस असता तर मग मी हेच नाव निवडलं असतं स्वतःसाठी.

अपार प्रेम लाभलेलं माझं अजून एक नाव म्हणजे इनिगोय. या नावासोबत मी लिहिती झाले, आजही माझा ब्लॉग याच नावाने आहे. आणि हो.. याचा अर्थ काय या प्रश्नाची तऱ्हेतऱ्हेची अतरंगी उत्तरं मी दिली आहेत, आणि हा बंगाली शब्द आहे का? हे रशियन नाव आहे का? असल्या उत्सुकताही शमवल्या आहेत!! धमाल नुसती!!

मग मात्र हळूहळू आयुष्यात योग आला, प्राणायाम, आसन, ध्यान या गोष्टींचा प्रवेश झाला. आणि योगिनी या शब्दाच्या अर्थाची अगदी किंचित झलक दिसू लागली. अनुभूती नाही पण अर्थ "सम"जला. वेगळेपण जाणवायला लागलं. वेळोवेळी स्वतःमध्ये होणारे बदल अनुभवताना नाव जास्तच आपलंसं वाटायला लागलं. या नावाला पूर्ण आत्मसात करता येणं किती कठीण आहे हे आता समजू लागलंय. "मला" इथपर्यंत आणून सोडणाऱ्या ठकी, मनू, बाबी, इनि आता थोड्या लांबूनच माझ्याकडे बघतात.

माझी गाडी आता "माझं नाव योगिनी" आणि "मी योगिनी" या दोन स्टेशनांच्या मध्ये रेंगाळतेय..........

Cracked Light Woman Sculpture (With images) | Sculpture, Light ...