आता ना मी स्वतःसाठी आॅफलाईन होणार आहे
सारखे येणारे माझे मेसेज साफ अडवणार आहे
माझ्यापर्यंत पोचतीलच कसे माझे अनंत विचार?
स्वतःपुरतं स्वतःलाच मी ब्लाॅक करणार आहे
दिवस उगवल्याच्या शुभेच्छा मी मला देणार नाही
सण, वाढदिवस एरवीसुद्धा फारसं महत्वाचं नसतं
ह्याच्यातिच्या सुखदुःखाचा फाॅरवर्ड पाठवणार नाही
ते सगळंतर डोक्यातलीही जागा अडवून बसतं
नाही येणार मला शोधत ओळी कवितांच्या..
नाहीच होणार अस्वस्थ मी अर्थामागे त्यांच्या
रंगीबेरंगी स्वप्नांचे फोटो पाठवणार नाही
लळा असल्या स्वप्नांचा नाहीतरी बरा नाही
मला माझं लास्ट सीन आता कधीच दिसणार नाही
माझ्या असण्या-नसण्याचा मी ट्रॅकच ठेवणार नाही
अवतीभवती असेनही "मी" पण मला समजणार नाही
हळूहळू "मी आहे.." हेही लक्षात राहणार नाही
स्वतःशी बोलत राहण्याचा वेळ वाचेल सारा
उलटसुलट विचारांचा होणार नाही पसारा
ठरलंय माझं..! स्वतःला मी ब्लाॅक करणार आहे
स्वतःपुरतं कायमचं मी आॅफलाईन होणार आहे.
- इनि ©