Friday, July 13, 2012

(स्त्री or पुरुष) = माणूस

रात्री झोपताना देवाला नमस्कार करून दिवसभरात झालेल्या चुकांबद्दल सॉरी म्हणणे, आणि चांगल्या गोष्टींबद्दल आभार मानणे हा नवर्‍याचा आणि मुलाचा नवा परिपाठ. काल मी घरी पोचेपर्यंत दोघे जागेच होते. त्यामुळे हा कार्यक्रम माझ्यासमोरच सुरू झाला. म्हटलं, मी पण येते आज तुमच्यात.
तर मुलगा म्हणाला, मम्माला यात नाही घेता येणार.
मी आणि नवरा दोघंही थोडे चकित झालो, पण नेहमीप्रमाणे त्याचं यात काय लॉजिक आहे, हे कुतुहल होतंच. नवर्‍याने 'का' असं विचारल्यावर उत्तर आलं, "कारण मम्मा गर्ल आहे. गर्ल्स चुका करत नाहीत, बॉईज करतात. म्हणून बाप्पाला सॉरी फक्त आपण म्हणायचं, आईने नाही..!"
मनाला अगदी गुदगुल्या झाल्या. खो खो हसण्याचा एक मोठा अ‍ॅटॅकच आला मला.! नवर्‍याचा चेहरा अगदीच बघवेना. त्यात मुलाने भर घातली, आमच्या टीचरने असं शिकवलंय. (मम्माने नाही.. नवर्‍याच्या मनातल्या शंकेला परस्पर उत्तर मिळालं.)
आज ऑफिसमधल्या मित्र-मैत्रिणींना हे सांगितल्यावर त्यांनाही हसू फुटलं. त्यावरून मग मुली आणि मुलगे, स्त्रिया आणि पुरुष अशी चर्चाही झाली.
पण मनाच्या एका कोपर्‍यात असं जेंडरबायस्ड जजमेंट मुलाच्या मनात रुजता कामा नये, हे सारखं येतंय. आई मुलगी आहे, म्हणजे ती कधीच चुकणार नाही, असं चुकीचं देवत्व लादून घ्यायचं नाहीये मला. आणि बाबा मुलगा आहे म्हणजे चुका करणारच, हेही नकोय. त्याहीपुढे, मुली नेहमी बरोबर आणि मुलगे नेहमीच चूक असं सरसकटीकरण तर नकोच नको. हा समज पक्का होण्याआधी काढून टाकायला हवा, आणि माझ्या बोलण्या-वागण्यातून त्याला खतपाणी घातलं जात नाहीये यावरही लक्ष ठेवायला हवं.
स्त्री आणि पुरुष कोणत्याही परिस्थितीत माणूस म्हणून वागतात, आणि चूक आणि बरोबर वागण्याच्या दोघांकडेही सारख्याच शक्यता असतात, हे छोट्याला आत्ताच सांगायला हवं.

Thursday, July 12, 2012

माझं पुस्तक

"...तू जे पुस्तक लिहिणार होतीस ते लिहायला लागलीस की नाही?"
दीड वर्षांनंतर पुन्हा मेसेज करणार्‍या मित्राने खुशाली विचारल्यावर टाकलेला हा पहिलाच प्रश्न. माझ्या सुखी आयुष्याच्या चौकटीत या प्रश्नालाच जागा उरलेली नाही, तर त्याचं उत्तर कसं असणार?
खरंतर त्या क्षणापर्यंत मी स्वतःला असं काही वचन दिलं होतं हेही माझ्या लक्षात नाही. पत्रकारितेच्या कोर्समधल्या युनिव्हर्सिटीतल्या टॉपरला  हे विसरण्याची वेळ आपल्यावर येईल, असं वाटावं तरी कसं? पण ती आलीये हे तर खरंच. नोकरीतल्या आकडेमोडीत आणि संसारातल्या बेरजा-वजाबाक्यांमध्ये लेखणी, कागद आणि शब्दही विखुरले गेले. पत्रकार असताना लिहिलेल्या लेखांची कात्रणं महिनोन् महिने माझ्या स्पर्शाची वाट बघत हळू हळू जीर्ण होतायत. संपादन करून दिलेल्या पुस्तकाची डोळ्यापुढे तरळत राहतात. घेतलेल्या मुलाखतींमधली उत्तरं, त्यांची ठिकाणं याच आयुष्यात अनुभवली का हा प्रश्न पडायला लागतो.
डोक्यात नवे विषय पिंगा घालतात. पण पानगळीतल्या पानांसारखे वार्‍यावर नकळत नाहीसेही होतात.

मग माझ्या डोळ्यांसमोर एक स्वप्न दिसायला लागतं.. मी एकाग्र चित्ताने समोरचं पुस्तक वाचतेय. कदाचित भाषांतरासाठी. किंवा मग संपादनासाठी. हाताशी असलेल्या शब्दकोषात अधूनमधून संदर्भ तपासतेय. दुरुस्तीच्या खुणा करत करत लेखनाला आकार देतेय. मधूनच 'तुमचा लेख मिळाला' हे कळवणारा फोन येतोय. 'अमकी मुलाखत करायची आहे, जमेल का?' हे विचारणारे संभाषण होते आहे. माझ्या अवती भवती फक्त आणि फक्त माझे खरे सोबती शब्दच आहेत.

...आणि माझा मित्र मला म्हणतोय, "तुझ्या पुस्तकाच्या प्रकाशनाला मला बोलाव बरं का?"

Monday, July 2, 2012

मिपावरच्या माझ्या स्वाक्षर्‍या

मिपा.
माहितीचा, आणि मनुष्यस्वभावाच्या सगळ्या नमुन्यांचा एक समुद्र.
उत्तमोत्तम लेखक, विषयांची भलीमोठी रेंज असलेले लेख, दिवसेंदिवस चालणार्‍या चर्चा, अभ्यासून दिलेल्या आणि टवाळकी करण्यासाठी दिलेल्या प्रतिक्रिया. सगळंच भरभरून.
म्हणून इथे वावरताना मी टोपणनाव घेतलं, असं की मी कोण, किती वयाची व्यक्ती आहे याचा अंदाज येऊ नये. म्हटलं तर माझं नावच. म्हटलं तर एक अगम्य शब्द.
लेखनाची माझी प्रकृती इथल्या वातावरणाहून थोडी वेगळी. त्यामुळे इथे अद्यापतरी लेख टाकलेला नाही. पण मनात उमटलेला प्रतिसाद मात्र नक्कीच नोंदवावासा वाटतो. तो नोंदवताना "स्वाक्षरी" हा स्वतःला किंचित का होईना व्यक्त करण्याचा सोपा मार्ग असल्याचं जाणवलं.
म्हणून मग स्वाक्षर्‍यांवर प्रेम जडलं. कधी कुठे वाचलेल्या ओळी वापरल्या. तर कधी स्वतःला सुचलेलं काही नोंदवलं. अशा माझ्या स्वाक्षर्‍यांपैकी मी रचलेल्या काही ओळी.
  1. तुझ्या आधी.. तुझ्या नादी.. तुझ्याही नंतर
    असणे माझे नु'लगडणारे गूढ निरंतर
  2. ...त्याचे त्याने यावे.
    माझे मी भिजावे.
    नकळत बीज रुजावे.
  3. "XPeria"ncing "U"...
  4. मी भारतीय असल्याचा मला अभिमान आहे.पण याची मला लाज वाटायला हवी असं काही जणांना का वाटतं?
    Why some people attempt to make me feel ashamed of the fact that “I am a proud Indian”?
  5. "माझी चाहूल लागताच पक्षी घाबरुन आकाशात उडाला...
    मी माझ्या सुभाषितांच्या वहीत एक नवीन वाक्य लिहिले:
    ... क्षुद्रांकडून धोका संभवताच शहाणे विराटाकडे धाव घेतात..."
  6. पूर्णपणे नास्तिक असणं हे अतिशय अवघड आहे.
    प्रत्येकाचा कोणता तरी देव असतोच!
    कोणाचा चार हातांचा, कोणाचा दोन हातांचा, आणि कोणाचा आरशात दिसणारा..
जसजशा लिहीत जाईन, तसतशी ही पोस्ट अपडेट होत राहील.