Thursday, July 12, 2012

माझं पुस्तक

"...तू जे पुस्तक लिहिणार होतीस ते लिहायला लागलीस की नाही?"
दीड वर्षांनंतर पुन्हा मेसेज करणार्‍या मित्राने खुशाली विचारल्यावर टाकलेला हा पहिलाच प्रश्न. माझ्या सुखी आयुष्याच्या चौकटीत या प्रश्नालाच जागा उरलेली नाही, तर त्याचं उत्तर कसं असणार?
खरंतर त्या क्षणापर्यंत मी स्वतःला असं काही वचन दिलं होतं हेही माझ्या लक्षात नाही. पत्रकारितेच्या कोर्समधल्या युनिव्हर्सिटीतल्या टॉपरला  हे विसरण्याची वेळ आपल्यावर येईल, असं वाटावं तरी कसं? पण ती आलीये हे तर खरंच. नोकरीतल्या आकडेमोडीत आणि संसारातल्या बेरजा-वजाबाक्यांमध्ये लेखणी, कागद आणि शब्दही विखुरले गेले. पत्रकार असताना लिहिलेल्या लेखांची कात्रणं महिनोन् महिने माझ्या स्पर्शाची वाट बघत हळू हळू जीर्ण होतायत. संपादन करून दिलेल्या पुस्तकाची डोळ्यापुढे तरळत राहतात. घेतलेल्या मुलाखतींमधली उत्तरं, त्यांची ठिकाणं याच आयुष्यात अनुभवली का हा प्रश्न पडायला लागतो.
डोक्यात नवे विषय पिंगा घालतात. पण पानगळीतल्या पानांसारखे वार्‍यावर नकळत नाहीसेही होतात.

मग माझ्या डोळ्यांसमोर एक स्वप्न दिसायला लागतं.. मी एकाग्र चित्ताने समोरचं पुस्तक वाचतेय. कदाचित भाषांतरासाठी. किंवा मग संपादनासाठी. हाताशी असलेल्या शब्दकोषात अधूनमधून संदर्भ तपासतेय. दुरुस्तीच्या खुणा करत करत लेखनाला आकार देतेय. मधूनच 'तुमचा लेख मिळाला' हे कळवणारा फोन येतोय. 'अमकी मुलाखत करायची आहे, जमेल का?' हे विचारणारे संभाषण होते आहे. माझ्या अवती भवती फक्त आणि फक्त माझे खरे सोबती शब्दच आहेत.

...आणि माझा मित्र मला म्हणतोय, "तुझ्या पुस्तकाच्या प्रकाशनाला मला बोलाव बरं का?"

No comments: