Wednesday, October 31, 2012

"ते" दोन प्रकारचे आहेत

देव दोन प्रकारचे आहेत.

- मला शिकवला गेलेला... आणि मला शिकवणारा.

- लोक ज्याच्याबद्दल बोलतात तो... आणि जो माझ्याशी बोलतो तो.

- ज्याची भीती बाळगायला मला सांगितले जाते तो... आणि जो मला दया म्हणजे काय हे दर्शवतो तो.

- जो दिलेल्या भेटींच्या बदल्यात कृपा करतो तो... आणि जो केलेल्या चुकांची मनःपूर्वक माफी मागितली असता देतो तो.

- जो नरकाचा धाक दाखवतो तो... आणि जो योग्य मार्ग दाखवतो आणि त्यावर राहायला मदत करतो तो.

- मी चुकल्यास माझ्याकडे पाठ फिरवतो तो... आणि माझ्या चुकांसहित माझ्यावर प्रेम करतो तो.
...

देव दोन प्रकारचे आहेत.
- माणसापेक्षा 'वरचा'... आणि माणसाच्या 'आतला'.

(स्वैर भाषांतर)

Friday, October 19, 2012

कधी अहिल्या, कधी मी राधा

कधी अहिल्या, कधी मी राधा
कधी जन्मले होऊन शबरी
सखी.. भगिनी.. तुझी आत्मजा..
कधी जन्मदा, कधी सहचरी..

आले.. रमले.. पुनश्च आले..
एकच ठेवून आस अंतरी
माझ्या मधली "शिळा" भंगण्या
पाउल उमटो "तुझे" श्रीहरी 

ढगफुटी

तो ही ढगच - जो साऱ्यांना हवा असतो
त्यांना हवं तेव्हाच, तेवढंच नेमकं बरसतो
नद्या, शेतं, माणसं, घरांना पाहिजे तेवढंच भिजवतो.

आणि तो ही ढगच -
जो स्वतःलाच सावरण्यास दुबळा ठरतो.
अपेक्षित नसताना अंदाधुंद कोसळतो.
कित्येकांचं - स्वतःचंही - अस्तित्वच मिटवतो.
फुटावं का बरसावं हे ढगाला ठरवता येत नसतं.
बरसण्याचं नशीब त्यालाही लिहून आणावं लागतं.


(चांगलं वागण्याची इच्छा आणि थोडीबहुत क्षमता असूनही स्वतःवर ताबा न ठेवता आल्याने चांगलं वागता येत नाही. अशाच एका प्रसंगानंतर त्याबद्दल विचार करताना सुचलेलं हे काही.)

Thursday, October 4, 2012

शब्दांचे अर्थ

तारीख - आधीची ...
'नजर आणि स्पर्श,' प्रेमाची ही भावना इतक सर्वश्रेष्ठ भावना आहे की नुसते शब्द कमी पडणार आहेत, हे जाणूनच निसर्गानं स्पर्श निर्माण केला. म्हणूनच प्रेमाची सांगता स्पर्शाशिवाय होत नाही.'
असं लिहिणारे वपु
'स्पर्श करताही आधार देता येतो, हे ज्याला समजलं तो खरा पालक'.. . असंही लिहून गेलेत.

पालकत्त्वात निव्वळ कर्तव्यभावना असते का मग?

तारीख - नंतरची ...
 
तसं नाहीय. स्पर्श करता आधार देऊ पाहणाऱ्याला स्पर्श करता येत नसतो, असं नाहीय.
पण दुखाःत असलेल्याला कधीकधी स्पर्श दुबळेपणही देऊ शकतो, हे त्याला माहीत असतं.

प्रेम व्यक्त होताना स्वतःची ताकद घेऊनच प्रकट होत असतं. तिथे स्पर्शातून दुणावण्याची किमया घडते, उणावण्याचा धोका नसतो.

त्याची डिटॅचमेंट

प्रिय,
निसर्गाचा सगळा प्रवास डिटॅचमेंटकडे सुरू असतो, नाही का?
वाळलेली पानं, फळलेला मोहोर, निगुतीने बांधलेली घरटी, मोठी झालेली पिल्लं, बरसून रिकामे झालेले ढग, कशातही गुंतून राहत नाही तो. आणि तरी सतत नव्याने प्रसन्न दिसत राहतो.

'समर्पयामि' हे माणसाला म्हणावं लागतं. तर कधी 'पुरे झालं आता' असं बजावायला लागतं. अर्पणपत्रिका लिहून अर्पण केल्याचीच नोंद ठेवण्याच्या विपर्यस्त मोहातूनही सुटत नाही तो.

निसर्गाचं तसं नसतं. खरंतर सगळ्यात देखणा असास्वादाचा अनुभव देऊ शकणारी अशी ही चीज आहे. इतका की घेणाऱ्यालाच नाही तर देणाऱ्यालाही त्या अनुभवाचा लोभ जडावा.

पण म्हणून निसर्ग वेगळा ठरतो.
समर्पण दरक्षणी.
आणि देऊन रिक्त झाल्यावर गेलेल्या क्षणाशी नितळ, निवळशंख, आरपार अलिप्तता.
ही पालवी गळूनच जायचीय म्हणून ती घडवताना खंत नाही, चुकारपणा तर नाहीच.. आणि बहराचा उत्सव साजरा करून ती गळून गेल्यावर तीसाठी झुरणंही नाही.
त्याला कौतुकाची थाप लागत नाही.
निषेधाचा सूर बोचत नाही.
उपेक्षेने हताशा होत नाही.
जात असलेल्याला थांबवू बघण्याची तगमग निसर्गाकडे नाही.

स्वयंपूर्ण असं हे प्रकटन आहे. देत राहणं, देत असताना निःसंग राहणं हा धर्म कर्णानेही इतका स्वीकारला नाही.

आता सांग, ही अशी डिटॅचमेंट खरंच सुरेख नाही का?