Saturday, July 11, 2015

नक्षी

तिची पाठ दरवाज्याकडे होती. स्वतःच्याच तंद्रीत ती खिडकीबाहेर पाहत होती. समोरचा बगिचा आता बर्फाच्या चादरीतून बाहेर पडून उमलायला लागला होता. आता या झाडांना पानं फुटतील, मग कळ्या येतील, त्या उमलतील.. माझ्या स्वप्नांसारख्याच! तिचे विचार सुरूच होते. होय. अजूनही तिच्या मनात कळ्या, फुले, पाने, चंद्र, सूर्य, तारे असे प्रेमकवितांमधले शब्द येत असत. पांढराशुभ्र घोडा, रुबाबदार राजकुमार, गोंडस मुलंबाळं, सुंदर सजलेलं घर, नोकरचाकर या कल्पनाविश्वात रमणं हा तिच्या दिनक्रमाचा भाग होता. जेमतेम १९ ची तर होती नेली जोनॅथन...
neli
चित्रः आनन्दिता
खिडकीतून बाहेर पाहत असतानाच ती हातातल्या भिंगाशी चाळा करत होती. तिथेच पडलेल्या नक्षीदार रुमालाने तिने भिंगाची काच स्वच्छ केली. तो रुमाल कसा विणायचा ते एमिलीने शिकवलं होतं तिला. तिच्या स्वप्नातल्या घरात असे सुंदर नक्षीचे कितीक रुमाल होते.. एमिलीला असं बरंच काही काही येत असे. सुंदर केशरचना कशी करावी, स्वतःला कसं सजवावं, चवीपरीचे केक्स कसे बनवावे.. आह! लग्नानंतर दूरच्या गावात गेलेल्या मैत्रिणीच्या विचाराने नेलीने उसासा टाकला. तिने पुन्हा भिंग हातात घेतलं आणि रुमालावरची सुबक नक्षी भिंगातून निरखायला सुरुवात केली..
त्या भिंगातून आरपार पाहतापाहता तिला एक घर दिसू लागलं. घराच्या व्हरांड्यात एक तिशीचा माणूस आरामखुर्चीत बसला होता. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव कसे होते ते नेमकं सांगता यायचं नाही. एकाचवेळी तो वैतागलेला आणि कंटाळलेला वाटत होता. त्याच्या आजूबाजूला दोन लहान मुलं खेळत होती. खेळणं कसलं.. गोंगाटच सुरू होता. त्यांच्या आवाजाने त्रासून अखेर त्या माणसाने जोरात हाक मारली. नेलीला नीटसं ऐकू आलं नाही, पण त्या आवाजाने घरातून एक बाई बाहेर आली. तिच्या कडेवर अजून एक तान्हं मूल होतं. जराशी स्थूल दिसत होती. तिचा पोशाख, केस, चेहरा काहीच ओळखीचं वाटेना.. तिचा चेहरा मात्र नेलीला ती आरशात पाहताना दिसत असे, तसा वाटला.. खरंच की! नेलीच होती ती! मग तो माणूस? ती मुलं? ओहो...!
बाहेर येऊन तिने त्या दोघा मुलांना उगाचच रागावल्यासारखं केलं. घरकाम आटपता आटपता मध्येच बाहेर यावं लागल्याने खरंतर तिची चिडचिडच झाली. आता बाहेर आलोच आहोत तर नोकराने घोड्यांना चारापाणी केलंय का ते बघून घ्यावं म्हणून ती पागेकडे वळली. तिला तिथे जाताना पाहून त्या माणसालाही आठवलं की बग्गीची डागडुजी करायला हवीय. मनाविरुद्धच तो खुर्चीतून उठला.
कसा कोण जाणे, पण त्या घरातला तिचा दिवस न संपणारा आणि रात्र न उजाडणारी होती! सगळ्या दिवसभराला पुरून उरतील अशी मुंग्यांची रांग लागावी तशी कामं सामोरी येत असत. कितीही वेळ गेला तरी ती रांग तशीच. न संपणारी. पागेची, घोड्यांची देखरेख करत असतानाच तिला आठवलं, दोघा मुलांना औषध द्यायची वेळ झाली होती. दोघांनाही सतत सर्दी, खोकला नाहीतर पोटाची तक्रार सुरूच असे. शिवाय सगळ्यात धाकटं तर अजून रांगायलाही लागलं नव्हतं. तिला आठवलं, रात्रभर जागरण करून आता ते तिच्या खांद्यावर गाढ झोपी गेलं होतं. तिला हेही आठवलं, की असं गाढ झोपल्याला तिला कैक वर्षं होऊन गेली होती...
ती पुन्हा घरात शिरली. आत शिरताच सगळ्या घराचे एकुणेक कोपरे तिला हाका मारत आहेत, असं तिला वाटायला लागलं. दिवाणखान्यातल्या फुलदाणीतली कोमेजलेली फुलं, आतल्या खोलीतल्या मेजावर पडलेला तऱ्हेतऱ्हेचा पसारा, स्वयंपाकघरातली भांडी, मागच्या व्हरांड्यात येऊन पडलेल्या मळ्यावरच्या भाज्या, न्हाणीघरात धुऊन ठेवलेले वाळत घालायचे असलेले कपडे! निर्जीव मनाने ती तो कोलाहल ऐकत राहिली.
कडेवरचं मूल चुळबूळ करू लागलं तसं ती त्याला झोपवण्यासाठी आतल्या खोलीत गेली. तिथल्या पलंगावर त्याला ठेवून माघारी वळताना खिडकीपाशी असलेल्या मेजावर चमकणाऱ्या वस्तूने तिचं लक्ष वेधून घेतलं. भिंग.. थबकून ती तिथल्या खुर्चीवर टेकली. ते भिंग हातात घेऊन त्यातून आरपार पाहता पाहता तिला फार पूर्वी पाहिलेली एक खोली दिसू लागली...
... त्या खोलीच्या खिडकीशी बसलेली एक तरुण मुलगी अविश्वासाने तिच्याकडे पाहत होती!

(पूर्वप्रकाशित)

2 comments:

Mohana Prabhudesai Joglekar said...

हृदयस्पर्शी. अनुवाद आहे का हा इंग्रजी कथेचा?

इनिगोय said...

अनुवाद नाही, ही माझी स्वतःचीच कथा आहे. जाणीवपूर्वक या त-हेने लिहिलेली. :)