Tuesday, June 19, 2012

आवर्त

इतरांनी केलेलं लेखन वाचून एक आवर्तात सापडायला होतं... एक तर ब्लॉग म्हणजे रेशमाच्या एकातून एक उलगडत जाणाऱ्या विविधरंगी लडी... त्या लडीही पुन्हा धाग्याधाग्यांनी बनलेल्या... किती आणि कसलं सॉलिड लिहितात लोक... भेटलेली / भेटू नयेशी वाटलेली माणसं, वाचलेली पुस्तकं, पुन्हा त्या पुस्तकांमधली माणसं, पाहिलेले सिनेमे, बदलणारे ऋतू - थोडक्यात जगताना वाटेत येणारं सगळंच...

मग आठवत राहतात पांढऱ्या कागदावर मी उमटवलेले ठिपके आणि रेषा... काही सुंदर आकार, थोडे स्पष्ट, थोडे धूसर...

Sunday, June 17, 2012

मन मनास उमगत नाही


मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा?
स्वप्नातील पदर धुक्याचा हातास कसा लागावा?

मन थेंबांचे आकाश, लाटांनी सावरलेले
मन नक्षत्रांचे रान, अवकाशी अवतरलेले
मन गरगरते आवर्त, मन रानभूल, मन चकवा,

मन काळोखाची गुंफा, मन तेजाचे राउळ,
मन सैतानाचा हात, मन देवाचे पाउल,
दुबळ्या गळक्या झोळीत हां सूर्य कसा झेलावा?

चेहरा- मोहरा याचा, कधी कोणी पाहिला नाही
धनि अस्तित्त्वाचा तरीही, याच्याहुन दूसरा नाही,
या अनोळखी नात्याचा कुणी कसा भरवसा द्यावा?

मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा?
स्वप्नातील पदर धुक्याचा हातास कसा लागावा?

इथून

Friday, June 15, 2012

चिमटीएवढी उणीव

तीन वर्षांपूर्वी कवितांच्या एका ब्लॉगवरून काही कविता उतरवून घेतल्या होत्या. त्यासोबत मला आवडलेली एक समांतर अर्थाची हिंदी कविताही तिथेच नोंदवली होती.

आयुष्यात मित्र, सखा असणं कायमच मला लुभवत आलंय. खास मुलींची म्हणून जी वागण्याची रीत असते, ती माझ्यात फार कृत्रीमपणे आणावी लागते. त्यामुळे मुली माझ्या मैत्रिणी असल्या तरी जिवलग नाही होऊ शकत.
असा जिवलग होण्याचं पोटेन्शियल असणार्‍या कोणाची चाहूल जरी लागली, तरी मग सारं अवधान त्या पायरवाकडे लागून राहतं. 'हा तोच का?' असा अधीर प्रश्न मनात सतत उसळत राहतो.

निर्मयीचा अस्तित्त्व म्हणूनच फार अनावर करतो.
श्रेयस आणि 'रीन च्या नात्यावरून जीव ओवाळावासा वाटतो.
राधेचा, द्रौपदीचा, मीरेचा कृष्ण हुरहूर लावतो.
जीए लाभलेल्या सुनिताबाई हे सगळ्यात भाग्यवान रूप वाटतं त्यांचं.
इमरोजच्या* अमृताचा तर मत्सरही वाटतो कधीतरी.

हे असं भास-आभासाच्या सीमेवरचं नातं पहिल्यांदा आयुष्यात आलं ते 'भातुकली' (हे नाव होतं बहुतेक) या वपुंच्या कथेतून. त्यातला राजा आणि राणीचा जगावेगळा संसार आणि अंती प्रकट होणारं त्याचं खरं स्वरूप माझ्या नव्हाळीच्या वयात खासच विलक्षण वाटला होता, आपलाही असावा असं वाटायला लावणारा. कित्येक काळ तर त्या राजालाच साद घालायची सवय लागली होती.

मग जगण्याचा रेटा वाढत गेला तसा राजा पुसला गेला. पण त्याची जागा भरून काढणारं कोणीतरी आजही हवंय. गेल्या काही काळात 'इनि' भेटली. ही इनि पण थोडी मुलगीच आहे, इनि या हाकेपासून सगळ्याच्याच प्रेमात! इनि, इन्या तू मुलगा असतीस तर मी पूर्ण झाले असते गं. माझ्या आत जे रिकामपण आहे, ते मिटलं असतं. भरून निघालं असतं.

फक्त माझं असं जग असावं या अपुर्‍या इच्छेला अखेरपर्यंत सोबत ठेवावं लागणार का इनि?
जो पायरव ऐकू येतो त्याच्यापाठोपाठ नुसती वार्‍याची विफल झुळूकच का येते?
अशा तर्‍हेची नाती प्रत्यक्षात नाहीच असू शकत का? जिथे भावनेची कोवळीक व्यक्त करायला शब्दांचे ढीग रचण्याची गरज भासू नये. जिथे साध्या हुंकारातूनही विश्व व्यक्त व्हावं.



*स्त्री ही देहापलीकडे खूपशी शिल्लक उरते, आणि ती त्यालाच लाभते, ज्याच्यावर 'ती' लुब्ध होते. असं इमरोजनं म्हटलंय. स्त्रीचं असं लुब्ध होणं हे निव्वळ शारीर कधीच असणार नाही. तिच्या अंतर्यामी असलेल्या चेतनेला साद न घालणार्‍याला ती त्या चेतनेची जाणीवही होऊ द्यायची नाही.