Tuesday, September 13, 2016

चार्ल्स बुकोव्स्कीचं शेवाळं



ब-याच महिन्यांपूर्वी एक कविता वाचण्यात आली होती. वाचता वाचताच तिचा केलेला हा भावानुवाद. मूळ कविता चार्ल्स बुकोव्स्की या जर्मनीत जन्मलेल्या रशियन नावाच्या अमेरिकन कवीची.
ओबडधोबड आयुष्य जगलेला हा लेखककवी लहानपणापासून अनेक थपडा खात हेलकावत राहिला. आत्यंतिक छळ, बेदम मार आणि कुचेष्टा हा दिवस आणि रात्रीसारखा त्याच्या आयुष्याचाच एक भाग होता. त्यातच कुठेतरी लिहितं व्हायची इच्छा कशी कोण जाणे मनात दबा धरून राहिली होती.
मात्र प्रकाशकांच्या अगम्य अनुभवांचे धक्के न पचून त्याने लिहिण्याकडे पाठच फिरवली. तसंही त्याच्याभोवतालच्या जगात लेखन उपरं होतंच. ते परागंदा झालं, इतकंच. तिथून पुढे त्या निर्जीव इच्छेची बोच आणि व्यावहारिक जगातल्या तडजोडी तो दारूच्या घोटाबरोबर गिळत राहिला वयाच्या पस्तिशीपर्यंत.
तब्बल अकरा वर्षं एखाद्या दारुड्या कामगाराचं उपेक्षित, हिणकस आयुष्य जगल्यानंतर त्याच्या त्या दबलेल्या इच्छेला पुन्हा जाग आली. भिंतीवर शेवाळं उगवावं तसे त्याचे शब्द पुन्हा उगवले. कोणत्याही निगराणीविना. सुशोभित, देखणं दिसण्याचा अट्टहास न करता. मग मात्र त्याच्या उरलेल्या आयुष्यावर त्याच्या कथा-कविता-कादंब-या बेगुमान वाढत गेल्या. साचलेलं, साठलेलं उमटत सुटलं. अर्थात चार्ल्सचा परिचय हा या धाग्याचा हेतू नसल्याने तो तपशील इथे देत नाही. पण तोवरची उपेक्षा एका दमात झुगारून चार्ल्स लिहिता झाला तो अखेरपर्यंत.
तशी ही कविताही म्हटलं तर त्याच्या आयुष्याचा सारांशच.
--------------------------------
तर लेखन करायचंय तुला.
पण जर ते तुला भेदून स्फ़ोटाप्रमणे बाहेर येत नसेल.
सर्व काही असूनही
तर नको.
परवानगीची पर्वा न करता आगंतुकासारखे ते तुझ्या हृदयातून, मनातून, तोंडातून आणि आतड्यातूनही बाहेर येत नसेल..
तर नको.
जर तुला तासन तास कळफ़लकाकडे पाहत बसावे लागत असेल
शब्द शोधत.. तर नकोच.
पैसा. प्रसिद्धी. शेजेला सोबत.
यासाठीही नको.
तिथं बसून अनेकवार पुनर्लेखन करण्यासाठी नको.
लिहिण्याचा विचार करणंही तुला कष्टाचं वाटत असेल तरी नको.
'त्यांच्यासारखं लिहावं' हा प्रयत्न करत असशील तर...
मग विसरूनच जा.
धुमसणारं, रोरावणारं ते काहीतरी तुझ्या आतून बाहेर पडावं म्हणून वाट बघावी लागत असेल, तर धीर धर.
नाहीच काही घडलं तर मग वेगळी वाट धर.
लिहिलेलं कोणालातरी वाचून दाखवावं लागत असलं..
तर तयार नाहीयेस तू अजून.
नको होऊस लेखक असणाऱ्या शेकडोंसारखा.
आणि स्वत:ला लेखक म्हणवणाऱ्या इतर हजारोसारखा.
नको होऊस कंटाळवाणा. अहंमन्य. स्वप्रेमात संपून गेलेला.
निव्वळ वाचकाच्या जांभईचा धनी.
जोवर अग्निबाणासारखं जळत ते तुझ्या आत्म्यातून झेपावत नाही.
जोवर निष्क्रीय, नि:शब्द राहणं तुला मरणप्राय वाटत नाही.
जोवर तुझ्यातली अंतस्थ धग तुझ्या धमन्या जाळत नाही.
तोवर नको लिहूस.
जर ती वेळ आलीच असेल आणि..
जर तुझी निवड झालीच असेल
तर ते स्वत:च उमटत जाईल तुझ्यातून. तुझ्या आतून.
उमटतच राहील.
तुझं अस्तित्त्व संपेतो.
किंवा मग तुझ्यातलं त्याचं अस्तित्त्व संपेतो.
दुसरा कोणताही मार्ग नाही.
कधी नव्हताच.

No comments: