Monday, September 19, 2016

चार्ल्स बुकोवस्कीचं शेवाळं : भाग २



चार्ल्स बुकोवस्कीबद्दल वाचताना आणि लिहिताना त्याची अजून ओळख करून घेण्यासाठी त्याच्या कविता वाचायला सुरुवात केली. शाब्दिक पाल्हाळाविना, यमक गमकाशिवाय लिहिलेल्या त्याच्या बहुतेक कविता स्वतःशी वाचणंसुद्धा सोपं नाही. अकारण नजरेत रोखून बघणारी व्यक्ती जशी समोरच्याला अस्वस्थ करते, तसं वाटायला लागतं.
त्यातल्या त्यात सौम्य अशा आणि जालावर उपलब्ध असलेल्या काहींचा भावानुवाद इथे द्यायला सुरुवात करत आहे. (प्रताधिकाराबाबत कल्पना नाही, जालावर सहज उपलब्ध असलेल्या कवितांची निवड केली आहे.)
आवडल्यास धन्यवाद चार्ल्सचे. नावडल्यास मर्यादा माझी..
या आधीच्या लेखात त्याच्या लहानपणाबद्दल उल्लेख केला होता, पहिली कविताही त्याच संदर्भात निवडली आहे. हेमिंग्वे ची Iceberg Theory चार्ल्स ला माहीत होती का ते ठाऊक नाही. पण ही ‘A smile to remember’ वाचल्यावर तेच आठवतं.
------------------
लक्षात राहिलंय ते हसू.
तेव्हा आमच्याकडे शोभेचे मासे होते
टेबलावरच्या काचेच्या भांड्यातच नेहमी गोल गोल पोहणारे ते मासे.
शेजारी हेलकावे खात खिडकीला झाकून टाकणारे जाड पडदे.
आणि तिथेच उभी असलेली माझी आई. नेहमी चेहऱ्यावर हसू असणारी.
‘आनंदी असावं रे हेन्री-’ ती मलाही सांगायची.
आणि बरोबरच होतं तिचं: ज्याला शक्य असेल त्याने आनंदी असायलाच हवं.
पण माझा धिप्पाड बाप मारायचा तिला, मलाही.
त्या बलदंड शरीरावर जे काही नकळत हल्ले करायचं - त्याच्याच आतून..
त्या ‘आतल्याचा’ प्रतिकार करताना गोंधळलेला, आतल्याआत धुमसणारा बाप झोडपत सुटायचा. नेहमीच.
माझी आई... बिचाऱ्या मासोळीसारखी आनंदी असण्याची इच्छा करणारी. मार खात मला सांगायची, ‘हेन्री हास पाहू! तुझ्या चेहऱ्यावर कधी हसू नसतं बघ! हे बघ, असा हास...’
- माझ्या आयुष्यातलं सगळ्यात करुण हसू मी त्या चेहऱ्यावर पाहिलं असेन.
एक दिवस ते गोल गोल फिरणारे पाचही मासे पोटं वर करून उघड्या डोळ्यांनी पाण्यात तरंगू लागले. शांतपणे.
घरी आल्यावर बापाने ते सगळे मांजरीच्या पुढ्यात टाकले.
- त्याही दिवशी आईच्या चेहऱ्यावर हसू होतंच.

No comments: