Tuesday, June 9, 2020

नाव काय!

तुम्हाला तुमचं नाव आवडतं का? तुमचं नावाची किती मंडळी तुम्हाला माहीत आहेत?

माझं नाव योगिनी. तसं मला लहानपणी फारसं कोणी नावाने हाक मारत नव्हतं. घरचे मला मनू म्हणायचे. त्यांच्यामुळे शेजारचेसुद्धा. आत्या कधीतरी बाबी म्हणायची. शाळेत जायच्या वयात आल्यावर पाळणाघरात ठेवलं होतं. ते घर छानशा सुबक चाळीतलं. धुडगूस घालायला भरपूर मुलं होतो आम्ही. तिथला उमेशदादा मला ठकी म्हणायचा ते आठवतं. ते ठसकेदार नाव मी अगदी विशीतिशीची होईपर्यंत त्याच्या हक्काचं होतं.

तर मुद्दा काय की आपल्या नावाचा अर्थ काय, ते आपल्याला आवडतं का हे प्रश्न डोक्यात उगवायची गरजच पडली नाही पहिली दहा वर्षं. नंतर एकदा एका पुस्तकावर योगिनी जोगळेकर हे नाव वाचलं आणि एकदम कॅच्याकै भारी वाटलं. तोवर माझं नाव शेअर करणारं दुसरं कोणी मला भेटलं नव्हतं. भेटलं तेही थेट पुस्तकाच्या पानावर! मुदलात मी म्हणजे आमच्या घरातला वाचुकिडा. त्यामुळे पुस्तक हा बिनपायाचा प्राणी माझ्यासाठी एऽऽऽकदम स्पेशल. त्यावर माझं नाव... हे म्हणजे पॉटरहेडचं स्वतःचंच नाव हार्मोयिनी किंवा मग जोऍन असण्यासारखं होतं. अर्थातच माझं नाव माझ्यासाठी आवडणारं झालं. नंतर कधीच ते बदलायचं वगैरे नाही हे कदाचित तेव्हाच ठरलं असेल माझं.

मोठं झाल्यावर मनू-ठकी-बाबी सगळं मागे पडलं आणि सोबत राहिलं ते योगिनी. अगदी अनकॉमन असल्याकारणाने तिथून पुढेही बरीच वर्षं मला दुसरी योगिनी भेटली नाही. ना कॉलेजमध्ये, ना नोकऱ्यांमध्ये. एवढ्या वर्षांत फक्त दोन योगिनी प्रत्यक्षात ओळखीच्या झाल्या आहेत. एक मात्र व्हायचं, हे नाव कानावर पडलेलं नसल्याने बरेचजण नीट ओळख झाल्यावरही हळूचकन योगितावर घसरायचे. आणि मग तिथून पुढच्या बोलण्यात प्रत्येक वाक्याला माझ्या डोक्यात सारखं "मैं योगिता नहीं योगिनी हूं.." हा ट्रॅक वाजत राहायचा. अगदी त्यांना मध्येच थांबवून "दहा वेळा म्हणा बरं... यो गि नी!" असं सांगायचा ठसकाही लागायचा...पण काय करता!

तोवर अर्थबिर्थ प्रकरण फार काही मनावर घेतलं नव्हतं. लेखाच्या खाली वेगवेगळ्या फॉन्टमध्ये छापून येणारं योगिनी नेने बघायला मस्त वाटायचं, अजूनही वाटतं. MNC जॉईन केल्यावर कोण्या फिरंगीने विचारलंच तर it means a lady monk हे सांगून टाकायचे. एकदा बीपीओत नोकरी केली तेव्हा तिथे कामासाठी नाव बदललं जायचं त्यात मला यास्मिन (उच्चारी जॅस्मिन) हे नाव मिळालं. तेव्हा माझ्या बाजूला बसायचा तो कलीग आणि मी अजूनही फोनबुकमध्ये आणि प्रत्यक्षातसुद्धा एकमेकांसाठी गॅरी आणि जॅस्मिन राहिलोय. तेही मस्त सुगंधी नाव भारी आवडलं. चॉईस असता तर मग मी हेच नाव निवडलं असतं स्वतःसाठी.

अपार प्रेम लाभलेलं माझं अजून एक नाव म्हणजे इनिगोय. या नावासोबत मी लिहिती झाले, आजही माझा ब्लॉग याच नावाने आहे. आणि हो.. याचा अर्थ काय या प्रश्नाची तऱ्हेतऱ्हेची अतरंगी उत्तरं मी दिली आहेत, आणि हा बंगाली शब्द आहे का? हे रशियन नाव आहे का? असल्या उत्सुकताही शमवल्या आहेत!! धमाल नुसती!!

मग मात्र हळूहळू आयुष्यात योग आला, प्राणायाम, आसन, ध्यान या गोष्टींचा प्रवेश झाला. आणि योगिनी या शब्दाच्या अर्थाची अगदी किंचित झलक दिसू लागली. अनुभूती नाही पण अर्थ "सम"जला. वेगळेपण जाणवायला लागलं. वेळोवेळी स्वतःमध्ये होणारे बदल अनुभवताना नाव जास्तच आपलंसं वाटायला लागलं. या नावाला पूर्ण आत्मसात करता येणं किती कठीण आहे हे आता समजू लागलंय. "मला" इथपर्यंत आणून सोडणाऱ्या ठकी, मनू, बाबी, इनि आता थोड्या लांबूनच माझ्याकडे बघतात.

माझी गाडी आता "माझं नाव योगिनी" आणि "मी योगिनी" या दोन स्टेशनांच्या मध्ये रेंगाळतेय..........

Cracked Light Woman Sculpture (With images) | Sculpture, Light ...

Tuesday, October 24, 2017

बौंड्रीपार जाताना – डेस्टिनेशन पुणे

अचानक पाठ दुखू लागणं, पोट दुखू लागणं, डोकं जड वाटणं.. झालंच तर बॅगमध्ये आपलं सामान मावणारच नाहीये इथपासून ते अलार्म बिघडलाय बहुतेक, जागच कशी येणार असली कैच्याकै कारणं डोक्यात उगवू लागणं.. आणि अधून मधून गाण्यातल्या धृवपदासारखं “जाऊ दे रद्दच करू” हे वाटत राहणं....... एखादा अत्रंगी प्रकार करण्याच्या आदल्या रात्री होणारे हे असे सगळे प्रकार आता माझे मला सवयीचे झाले आहेत. 😄 त्यामुळे यावेळी हे सगळं एन्जॉय करतच मी माझी सॅक भरून घेतली, सकाळचा अलार्म ते नाश्ता या दोन टोकात करायच्या सगळ्या गोष्टींची सोय आणि पूर्वतयारी केली, आणि तय्यार झाले एका नव्या उद्योगासाठी!
झालं असं की या वर्षीच्या पावसाळ्यात एक मस्त रोड ट्रीप पार पडली आणि “असं आपलं आपल्याला फिरता आलं पाहिजे” हे डोक्यात आलं. चारचाकी चालवायला मला तितकंसं आवडत नाही, त्यात फारसं थ्रील नाही, आणि माझ्याकडे बाईक नाही. त्यामुळे माझ्याकडे फक्त होंडा अॅक्टिवाचा एकमेव पर्याय उपलब्ध होता. मुंबईमध्ये इथे ठाण्यापासून तिथे पार फोर्टपर्यंत गाडी अनेको वर्षं पळवलेली असल्याने आणि तिच्यावर बागडणं हा माझा पार थेरपी लेव्हलचा नितांत आवडता प्रकार असल्याने तेही चाललं असतं. पण लॉंग ट्रीपसाठी बाईकशी तुलना केली तर अॅक्टिवाचे लहान टायर्स, एका बाजूला असलेलं इंजिन, एकुणातच छोटा जीव.. असं सगळं असताना त्या गाडीवर कितीसं फिरता येणार असं वाटलं आणि माझा रोड ट्रीपचा विचार आला तसा कोपऱ्यात गेला.
हे सगळं सुरू होतं सप्टेंबर मध्ये. आणि एक दिवस फेसबुकवर एका पोस्टमध्ये ‘निशा राव’, होंडा अॅक्टिवाआणि काश्मिर ते कन्याकुमारीहे सगळे शब्द सलग वाचायला मिळाले. मी ती पोस्ट वाचत असताना तोंडाचा आ वासणे, डोळे विस्फारणे, खुर्चीतून तीनताड उडणे या सगळ्याचा डेमो अवतीभवती असलेल्या लोकांना मिळाला असणार हे नक्की!! ते जे काही तपशील होते, ते इथे वाचता येतीलच. पुण्याच्या या मुलीबद्दल वाचल्यावर आधी तिची मुलाखत घ्यायचाच विचार डोक्यात आला. पण मग तो रद्द केला, कारणं वेगवेगळी होती. पण सगळ्यात महत्त्वाचं होतं ते म्हणजे... नुसती मुलाखतच काय घ्यायची.. हे!! एवढं अफाट काहीतरी केलेल्या मुलीला “आता कसं वाटतंय” छाप प्रश्न विचारणं साफच नामंजूर होतं मला. 🙆🙆 पण तरी तिला भेटावंसंही वाटत होतं. वेगळं काहीतरी करायला हवं... पण काय?
केदार ओकने त्या पोस्टमध्ये अखेरीस म्हटलं होतंच की - खरंच, तुम्ही ह्याला आवड म्हणा, क्रेझ म्हणा, ध्यास, पॅशन, वेड, किडा, भुंगा - काय वाट्टेल ते म्हणा. पण बॉस, ह्यातलं काहीतरी, मग ते कशाच्याही बाबतीतलं असूदे; आपल्या गाठीशी हवं म्हणजे हवंच. हे किडे प्रत्येकाला चावले पाहिजेत.
मग म्हटलं लहर आलीच आहे तर कहर करूयाच - किडा मला आधीच चावलाय.. तो पक्का नीटच चावून घ्यावा आता. एकटीनं भटकायला जायचं, तेही आपल्या अॅक्टिवावरूनच. अशा तऱ्हेने त्या दिवशी माझी स्वतःची पहिली सोलो रोड ट्रीप मला चावली! 🛵
पहिल्यावहिल्या सोलो ट्रीपसाठी रूट ठरवताना दोनच पर्याय होते – कोकण किंवा पुणे. आधीची रोड ट्रीप कोकणातलीच होती म्हणून आणि पुणं तसं माहितीचं, सवयीचं म्हणून. पैकी पुणे नक्की केलं, दिवाळीनंतर तिथे करियर कौन्सिलिंगच्या नेहमीच्या कामासाठी खेप करायची होतीच हे एक कारण आणि निशा पुण्यात असते, तिला भेटता येईल हेही. दिवस ठरला २२ ऑक्टोबरचा. मग तिच्याच त्या पोस्टच्या मदतीने घरी सुतोवाच करून टाकलं.
मग हे सगळं डिस्कस करायला मुंबई-पुणे ये जा करणाऱ्या मित्रांना विचारायला सुरुवात केली. खरं सांगते – जेवढ्या जणांना विचारलं त्या सगळ्यांनी “वेडी आहेस का?” हा प्रश्न इतक्यांदा आणि असा काही एकमताने विचारला; की अजून काही वेळा ऐकलं असतं तर मी वेडीच आहे अशी माझीच खात्री पटली असती कदाचित. अगदी नेमाने सोलो ट्रीप करणाऱ्या मित्राचाही याला अपवाद नव्हता. अर्थात अशा उत्तरांनी माझा प्लान जास्तच पक्का केला हेही खरं. रिस्की आहे, अॅक्टिवावर नाही जमणार – एक ना दोन... धड काही उत्तरं मिळेनात त्यामुळे निघायच्या आदल्या संध्याकाळपर्यंत काहीही नीट ठरलं नव्हतं... पुण्यालाच तर जायचंय म्हणून असेल पण मी फार चिंतेत नव्हते.
काही फिरस्त्या लोकांना जवळून ओळखत असल्याने आणि स्वतःही लॉंग ट्रिप्स करत असल्याने प्रवासाची तयारी हा भाग नवा नव्हता, वस्तूंच्या याद्या तयार असतातच. फक्त यावेळी दुचाकीवरून एकटीनेच जायचं असल्याने मोजकं, लागेल तेच सामान हा क्रायटेरिया होता, आणि जास्तीचं असं फक्त टूलकीट असणार होतं – जे मला वापरता येत नाही... :( बाईकच्या तुलनेत अॅक्टिवाचा फूटबोर्ड आणि डिकी ही एक सोयीची गोष्ट असते. खांदे मोकळे राहतात आणि सामान नजरेसमोर राहतं. घरून निघाल्यापासून पोचायला फार तर पाच तास लागतील हे माहीत असल्याने फार काटेकोर तयारीही करायची गरज नव्हती.
आता आली गाडीची आणि माझी स्वतःची सर्विसिंग – पैकी गाडीचं काम सोपं होतं, ते सप्टेंबर अखेरीस करून घेतलं. पण मी म्हणजे शरीरात किती सांधे असतात हे त्यांच्या दुखत असण्यावरून अचूक सांगू शकेन असं मॉडेल आहे, शिवाय खांदे आणि गुडघे आपटून, मोडून घेणे हे माझं जन्मसिद्ध कर्तव्य असल्यासारखं तेही मी पार पाडत असते. कशाकशाचं सर्विसिंग करणार ना? त्यामुळे तो विचारच न करता आपल्याला पाच, लागलेच तर सहा तास गाडी चालवायचीच आहे एवढं स्वतःला बजावून मेंटल सर्विसिंग करून टाकलं.. संपला विषय!
दुसरीकडे बाईकिंगला वाहिलेल्या साईट्सवरून माहिती गोळा करणं सुरू होतंच. एका साईटवर आयता रोडमॅपच हाती लागला. मी “फ्रॉम व्हीनस” जमातीची असूनही मॅप वाचता येण्यात कैच अडचण येत नाही मला. शिवाय गुगल मॅप वापरण्याचा दिल्ली, बंगळूर, गुजराथ अशा ठिकाणांचा यशस्वी अनुभव असल्याने हे तर सोपंच होतं. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेला न लागता जुन्या रस्त्याला जाण्यासाठीचा एक्झिटच काय तो महत्वाचा होता, तो डोक्यात बसवला – कारण दुचाकी चालवत असताना मोबाईलचा उपयोग शून्य, ऐनवेळी गाडी बाजूला घ्या, थांबा हे मला नको होतं. त्यासाठी वाटेवरच्या मोठमोठ्या लँडमार्क्सची नावंही पाहून ठेवली. पुण्यात पिंपरीचिंचवडच्या दिशेने शिरायचं असं त्या रोडमॅपवरून दिसत होतंच.
निघायच्या आठवडाभर आधी नेमकं स्पीडोमीटर बंद पडलाय असं लक्षात आलं, शिवाय अगदी बारीक असा खुळखुळ्यासारखा आवाज यायला लागला. परत गाडी देऊन आले.... इथे मात्र – जाऊ दे, कशाला, उगाच उद्योग कोणी सांगितलेत.. असे संवाद असलेला आणि कोणती तरी केबल तुटलीय, नाहीतर गाडी पंक्चर झालीय, आपण ती ढकलत नेतोय, वगैरे सीन असलेला सिनेमा डोक्यात सुरू झाला. यावर सोपा उपाय असतो तो केला – डोक्यातला चॅनल बदलणे ;) त्यापुढचा अजून घोळ म्हणजे मी पुण्यात जिथे मुक्काम करणार होते ती मंडळी दिवाळीसाठी बाहेर गेली होती. ती काही कारणाने रविवार सकाळ ऐवजी संध्याकाळी परत येणार होती. मी दुपारी पुण्यात पोचणार होते. त्यामुळे आदल्या चार दिवसात जास्तीच्या चार तासांची सोय करणं भाग पडलं. मग चक्क त्यांच्या घराजवळचा सिनेमा हॉल मुक्रर केला.. भले सिनेमा पाहू, नाहीतर चक्क झोप काढू; पण काय वाटेल तरी हा अनुभव घ्यायचाच आहे हे इतकं पक्कं केलं होतं की सगळे शंकेखोर मुद्दे, अडथळे ऑप्शनलाच टाकत गेले.
शनिवारी दुपारनंतर फायनल तयारीला लागले. सामान भरलं. फार लवकर नाही आणि फार उशिरा नाही असं निघायचं ठरवलं होतं. रात्री नऊनंतर आठवलं, टाकी फुल केलेली नाही. मग तेवढ्यासाठी बाहेर पडायचा कंटाळा केला, आणि आवरून दहालाच झोपायला गेले. तर उत्साह आणि टेन्शन या जालीम कॉम्बिनेशनमुळे साडेअकरा वाजले तरी झोप येईना. शेवटी एकदाची झोप लागली केव्हातरी.

ठरवल्या दिवशी ठरवल्याप्रमाणे आवरून ठरवल्या वेळेला – ८.१५ ला घराबाहेर पडले. पेट्रोल टाकायला गेले तर “नेहमीचा” पंप बंद होता, मग दुसरीकडे जाऊन सोपस्कार पूर्ण केले – मात्र प्लानपेक्षा हा जास्तीचा वेळ लागूनही मी नऊ वाजेपर्यंत सायन पनवेल हायवेला लागले. तिथून सरळसोट पनवेलच्या मॅकडोनाल्डस् पर्यंत जायचं होतं. हे तसं विस्तारित मुंबईच असल्याने कोणतेही नयनरम्य दृश्यांचे अडथळे न येता गाडी सुसाट पळवली. नऊ वीसला मी चक्क एक्प्रेस वे च्या एक्झिटच्या जवळ पोचले होते. तिथे एक सरकारमान्य ब्रेक घेतला.

मग एक्प्रेसवेच्या “दुचाकींना प्रवेशबंदी”च्या पाटीला टाटा करत फ्लाय ओव्हर खालून उजवी घेतली. शेडुंगचा एक्स्प्रेसवे साठीचा एक्झिट मागे पडला, मजल दरमजल करत “खोपोली – २७” दिसलं, मुंबई मागे राहिलं हे एकदम जाणवलं आणि मग सकाळपासून पळवत आणलेली गाडीही आपोआपच रमत गमत चालवायला लागले. तो रस्ता एकदम मस्त झाडांच्या हिरव्यागार कमानींचा, जेमतेम वर्दळ असलेला असा आहे. त्यामुळे इथे काही ठिकाणी फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. गाडीचेही काही सेल्फी काढले. 

नेहमी पुण्याची वाट ही गारेगार शिवनेरीतून पाहत असल्यामुळे आजची मजा वेगळीच होती. एका पॅचला तर मी आणि माझी गाडी फक्त दोघीच बराच वेळ पळत होतो, बाकी रस्ता पूर्ण रिकामा.... या निवांत रस्त्यावर मी अर्ध्या तासाहून जास्त वेळ घालवला असेल. 
खोपोलीतून रस्ता गावातून जाणार की बाहेरूनच हे माहीत नव्हतं. तो जरासा गावातून जात बाहेर पडला आणि मग सुरू झाला घाट रस्ता. इथल्या वळणांवर मागच्या पुढच्या गाड्यांचे वेग बघून जागा देत देत दुचाकी चालवण्याची माझी पहिलीच वेळ.... नाही म्हटलं तरी जरा धडधडत होतंच. मग मुंबईचा बम्पर टू बम्पर ट्राफिक डोळ्यापुढे आणला आणि तिथं जमतंय मग हे जमेलच म्हणत घाट चढत गेले.
अशा प्रवासाची एक मजा असते, नशा असते.. तुम्ही पूर्णपणे स्वतःच्या सहवासात असता.. मनाला आलं तर स्वतःशी गप्पा माराव्या, नाहीतर आजूबाजूला पाहत गाडीची लय पकडावी.. काही मस्त संदर्भ आठवतात, कविता, गाणी आठवतात, ती एन्जॉय करावी.. आपलीआपलीच मैफल मस्त जमत जाते. नुकताच मी भारताच्या भूरचनेवर शंकराच्या संदर्भाने लिहिलेला ‘मौज’ मधला लेख वाचला होता, अश्विन पुंडलिकांनी त्यात सह्याद्रीचे खूप छान उल्लेख केले आहेत. रस्त्याच्या पलीकडे नजर गेली की त्यातली अप्रतिम वर्णनं जणू चित्रमय होत होती. लेखातला लाखो वर्षांपूर्वी जन्माला आलेला रौद्र सह्याद्री मनात होता आणि आज आता माणसाळलेला सह्याद्री नजरेसमोर होता. तो सगळा लेखच मी या टप्प्यात “पाहिला” असेन..
हळूहळू रिसोर्ट्सच्या पाट्या दिसायला लागल्या, रस्त्यावरची वर्दळ वाढत राहिली आणि मी लोणावळ्यात प्रवेश केला. इथे तर व्यवस्थित ट्रॅफिकच लागला. इथून बाहेर पडताना दोन तीन ठिकाणी एक्स्प्रेस वे बाजूने किंवा वरून जातो, मुंबई पासिंगच्या गाड्या काढून सकुसप फिरायला बाहेर पडलेले, सेल्फी काढणारे, उत्साही वाटून घेणारे तुंदिलतनु लोक दिसत राहतात. इथून अगदी जराशा पट्ट्यात एक्स्प्रेस वेवरून जावं लागतं.
राजमाची पॉईंटच्या अलीकडे ही कृष्णसुंदरी रस्त्याकडेला उभी होती. अतिशय आवडती गाडी असल्याने त्या डेंजर वळणावरही थांबून फोटो घेतलाच.

थोडं पुढे माझ्या “डर के आगे जीत है” या स्टोरीच्या पहिल्या एपिसोडचा नायक ड्युक्स नोज नजरेला पडला, त्याला हात करून पुढे निघाले. (ती स्टोरी पुन्हा कधीतरी.)
लोणावळा, खंडाळा मागे पडलं की पुढे तसा सपाटीचाच रस्ता आहे. इथं मग मी एका कानात हेडफोन खुपसले आणि गाणी ऐकत ऐकत रस्ता संपवला. आतापर्यंत नसलेलं ऊन आता जरा जाणवायला लागलं होतं. सोबतच्या गाड्यांवर आता लेंगे टोप्या घातलेले बाप्ये, एका बाईकवरून चाललेले तिघंचौघं स्वार दिसायला लागले – आलं, पुनवडी जवळ आलं!
तेवढ्यात देहूची पाटी दिसली. देहू म्हटलं की आर्मीचं कँटॉनमेंट डोक्यात येतंच, पण मध्येच तुकारामाबावासुद्धा एका कमानीवर बसलेले दिसले आणि मला स्वतःचंच हसायला आलं... आर्मीच्याही आधी ते आठवायला हवे होते, देहू आधी त्यांचं नाही का! कँटॉनमेंटच्या आसपासचा २-४ किमी रस्ता अगदीच वाईट आहे. तिथं गाडी स्लो ठेवत आणि पाट्यांवरही लक्ष ठेवत पुढे आले.
चिंचवडपाशी विनोद झाला.. चालत्या गाडीवरूनच शेजारच्या एका बाईक स्वाराला विचारलं, पुण्यात अभिरुचीला जायचंय, हाच रस्ता जात राहिल ना? तो फार धक्का लागल्यासारखा चेहरा करून म्हणे – अहो केवढं लांब आहे ते इथून, कस्काय जाणार तुम्ही? मनात आलं, फार लांब?? मग काय गाडी इथंच ठेवा नि बसने जा म्हणणार की काय हा..! वाकडेवाडीच्या जवळ एक राईट टर्न घेऊन शिवाजीनगर गाठायचं होतं, तिथे सिग्नलवर बाजूच्याला एकदा विचारलं, तर तेही तसंच.. “इकडून राईट घ्या नाहीतर पुढून घ्या, आपल्याला काय, कुठलातरी राईट घ्यायचाच है”... 
असल्या मनरंजक सहप्रवाशांसोबत सफर काटत काटत मी अखेर ‘निशा रावच्या’ पुण्यात प्रवेश करती झाले. तिथून मग म्हात्रे पूल का लकडी पूल, हा राईट की तो लेफ्ट, येणारा सिग्नल की त्यानंतरचा अशा आट्यापाट्या खेळत फायनली मुक्काम गाठला तेव्हा घड्याळात दुपारचे पावणेदोन वाजले होते! 

आणि युरेक्क्का असं ओरडत मी माझ्या मनातलं पुढचं डेस्टिनेशन ठरवलंही होतं..!

(सुमारे दीडशे किलोमीटरचं हे अंतर एकटीने दुचाकीवर पार पाडण्यात मी फार काही विशेष केलंय असं नक्कीच नाही... पण तरीही हे मुद्दाम इथे लिहावंसं वाटलं. साध्याशाच गोष्टी नेटाने केल्या तर मिळणारा आनंद किती मोठा असू शकतो!! पण त्याऐवजी त्या न करण्यासाठी आपण कितीतरी कारणं देत असतो, कारणांनाच कायम चिकटून राहतो. या कारणांच्या बाउंड्रया आपणच स्वतःला घालून घेतल्याने दुसऱ्याने केलेल्या अचाट गोष्टींवर तोंडात बोट घालणं इतकंच होत राहतं. खरंतर ते अचाट काहीतरी प्रत्येकजण करू शकतो – प्रश्न फक्त इच्छेचा असतो.

हे स्त्रियांच्या बाबतीत तर हमखास दिसतं. माझ्या अनेक मैत्रिणींना दुचाकी न चालवण्याची भीती वाटते, “हे” नको म्हणतात अशी तीच ती निमित्तं पुढे करताना मी नेहमीच ऐकत असते. आणि बरेचसे “हे” सुद्धा आपापल्या बायकांना बाईका चालवायला चक्क नकार (!) वगैरे देत असतात. पण दुचाकी चालवण्यात केवढीतरी सोय आहे आणि त्यापुढे जाऊन असलं काहीतरी करण्यात अचिव्हमेंटचा आनंद तर अपार आहे! माझ्या बाबतीत निशामुळे मला तो मिळाला. माझ्या या लेखातून दहातल्या चौघींना जरी गाड्या चालवायचा हा किडा चावला, तरी माझा (लेखाचा) खटाटोप सफल झाला असं मला वाटेल.)

Wednesday, September 27, 2017

ब्लाॅक करणार आहे

आता ना मी स्वतःसाठी आॅफलाईन होणार आहे
सारखे येणारे माझे मेसेज साफ अडवणार आहे
माझ्यापर्यंत पोचतीलच कसे माझे अनंत विचार?
स्वतःपुरतं स्वतःलाच मी ब्लाॅक करणार आहे

दिवस उगवल्याच्या शुभेच्छा मी मला देणार नाही
सण, वाढदिवस एरवीसुद्धा फारसं महत्वाचं नसतं 
ह्याच्यातिच्या सुखदुःखाचा फाॅरवर्ड पाठवणार नाही
ते सगळंतर डोक्यातलीही जागा अडवून बसतं

नाही येणार मला शोधत ओळी कवितांच्या..
नाहीच होणार अस्वस्थ मी अर्थामागे त्यांच्या
रंगीबेरंगी स्वप्नांचे फोटो पाठवणार नाही
लळा असल्या स्वप्नांचा नाहीतरी बरा नाही

मला माझं लास्ट सीन आता कधीच दिसणार नाही
माझ्या असण्या-नसण्याचा मी ट्रॅकच ठेवणार नाही  
अवतीभवती असेनही "मी" पण मला समजणार नाही
हळूहळू "मी आहे.." हेही लक्षात राहणार नाही

स्वतःशी बोलत राहण्याचा वेळ वाचेल सारा
उलटसुलट विचारांचा होणार नाही पसारा
ठरलंय माझं..! स्वतःला मी ब्लाॅक करणार आहे
स्वतःपुरतं कायमचं मी आॅफलाईन होणार आहे.

- इनि ©

Thursday, September 21, 2017

शब्दांचं क्षितिज

श्वासांत कोंडल्या माझ्या
आकांत उभा गुदमरतो
क्षण क्षण मी अनुभवलेला
आतल्याआत घुसमटतो

ती मुठभर तडफड माझीच
धडधडते ना हृदयात?
ते लालभडक जे बीज
मी नसानसातून जगतो

या शरीरातुन अर्थांचे
उगवेल कधी ते रान??
आभाळा घालून कोडे
मी अधीर अनावर होतो

अंतरि धुमसते अक्षर
जिवघेणा मी कळवळतो
शब्दांच्या क्षितिजापाठी
मी ऊर फुटेतो पळतो

- इनि ©

Monday, September 19, 2016

चार्ल्स बुकोवस्कीचं शेवाळं : भाग २



चार्ल्स बुकोवस्कीबद्दल वाचताना आणि लिहिताना त्याची अजून ओळख करून घेण्यासाठी त्याच्या कविता वाचायला सुरुवात केली. शाब्दिक पाल्हाळाविना, यमक गमकाशिवाय लिहिलेल्या त्याच्या बहुतेक कविता स्वतःशी वाचणंसुद्धा सोपं नाही. अकारण नजरेत रोखून बघणारी व्यक्ती जशी समोरच्याला अस्वस्थ करते, तसं वाटायला लागतं.
त्यातल्या त्यात सौम्य अशा आणि जालावर उपलब्ध असलेल्या काहींचा भावानुवाद इथे द्यायला सुरुवात करत आहे. (प्रताधिकाराबाबत कल्पना नाही, जालावर सहज उपलब्ध असलेल्या कवितांची निवड केली आहे.)
आवडल्यास धन्यवाद चार्ल्सचे. नावडल्यास मर्यादा माझी..
या आधीच्या लेखात त्याच्या लहानपणाबद्दल उल्लेख केला होता, पहिली कविताही त्याच संदर्भात निवडली आहे. हेमिंग्वे ची Iceberg Theory चार्ल्स ला माहीत होती का ते ठाऊक नाही. पण ही ‘A smile to remember’ वाचल्यावर तेच आठवतं.
------------------
लक्षात राहिलंय ते हसू.
तेव्हा आमच्याकडे शोभेचे मासे होते
टेबलावरच्या काचेच्या भांड्यातच नेहमी गोल गोल पोहणारे ते मासे.
शेजारी हेलकावे खात खिडकीला झाकून टाकणारे जाड पडदे.
आणि तिथेच उभी असलेली माझी आई. नेहमी चेहऱ्यावर हसू असणारी.
‘आनंदी असावं रे हेन्री-’ ती मलाही सांगायची.
आणि बरोबरच होतं तिचं: ज्याला शक्य असेल त्याने आनंदी असायलाच हवं.
पण माझा धिप्पाड बाप मारायचा तिला, मलाही.
त्या बलदंड शरीरावर जे काही नकळत हल्ले करायचं - त्याच्याच आतून..
त्या ‘आतल्याचा’ प्रतिकार करताना गोंधळलेला, आतल्याआत धुमसणारा बाप झोडपत सुटायचा. नेहमीच.
माझी आई... बिचाऱ्या मासोळीसारखी आनंदी असण्याची इच्छा करणारी. मार खात मला सांगायची, ‘हेन्री हास पाहू! तुझ्या चेहऱ्यावर कधी हसू नसतं बघ! हे बघ, असा हास...’
- माझ्या आयुष्यातलं सगळ्यात करुण हसू मी त्या चेहऱ्यावर पाहिलं असेन.
एक दिवस ते गोल गोल फिरणारे पाचही मासे पोटं वर करून उघड्या डोळ्यांनी पाण्यात तरंगू लागले. शांतपणे.
घरी आल्यावर बापाने ते सगळे मांजरीच्या पुढ्यात टाकले.
- त्याही दिवशी आईच्या चेहऱ्यावर हसू होतंच.

Tuesday, September 13, 2016

चार्ल्स बुकोव्स्कीचं शेवाळं



ब-याच महिन्यांपूर्वी एक कविता वाचण्यात आली होती. वाचता वाचताच तिचा केलेला हा भावानुवाद. मूळ कविता चार्ल्स बुकोव्स्की या जर्मनीत जन्मलेल्या रशियन नावाच्या अमेरिकन कवीची.
ओबडधोबड आयुष्य जगलेला हा लेखककवी लहानपणापासून अनेक थपडा खात हेलकावत राहिला. आत्यंतिक छळ, बेदम मार आणि कुचेष्टा हा दिवस आणि रात्रीसारखा त्याच्या आयुष्याचाच एक भाग होता. त्यातच कुठेतरी लिहितं व्हायची इच्छा कशी कोण जाणे मनात दबा धरून राहिली होती.
मात्र प्रकाशकांच्या अगम्य अनुभवांचे धक्के न पचून त्याने लिहिण्याकडे पाठच फिरवली. तसंही त्याच्याभोवतालच्या जगात लेखन उपरं होतंच. ते परागंदा झालं, इतकंच. तिथून पुढे त्या निर्जीव इच्छेची बोच आणि व्यावहारिक जगातल्या तडजोडी तो दारूच्या घोटाबरोबर गिळत राहिला वयाच्या पस्तिशीपर्यंत.
तब्बल अकरा वर्षं एखाद्या दारुड्या कामगाराचं उपेक्षित, हिणकस आयुष्य जगल्यानंतर त्याच्या त्या दबलेल्या इच्छेला पुन्हा जाग आली. भिंतीवर शेवाळं उगवावं तसे त्याचे शब्द पुन्हा उगवले. कोणत्याही निगराणीविना. सुशोभित, देखणं दिसण्याचा अट्टहास न करता. मग मात्र त्याच्या उरलेल्या आयुष्यावर त्याच्या कथा-कविता-कादंब-या बेगुमान वाढत गेल्या. साचलेलं, साठलेलं उमटत सुटलं. अर्थात चार्ल्सचा परिचय हा या धाग्याचा हेतू नसल्याने तो तपशील इथे देत नाही. पण तोवरची उपेक्षा एका दमात झुगारून चार्ल्स लिहिता झाला तो अखेरपर्यंत.
तशी ही कविताही म्हटलं तर त्याच्या आयुष्याचा सारांशच.
--------------------------------
तर लेखन करायचंय तुला.
पण जर ते तुला भेदून स्फ़ोटाप्रमणे बाहेर येत नसेल.
सर्व काही असूनही
तर नको.
परवानगीची पर्वा न करता आगंतुकासारखे ते तुझ्या हृदयातून, मनातून, तोंडातून आणि आतड्यातूनही बाहेर येत नसेल..
तर नको.
जर तुला तासन तास कळफ़लकाकडे पाहत बसावे लागत असेल
शब्द शोधत.. तर नकोच.
पैसा. प्रसिद्धी. शेजेला सोबत.
यासाठीही नको.
तिथं बसून अनेकवार पुनर्लेखन करण्यासाठी नको.
लिहिण्याचा विचार करणंही तुला कष्टाचं वाटत असेल तरी नको.
'त्यांच्यासारखं लिहावं' हा प्रयत्न करत असशील तर...
मग विसरूनच जा.
धुमसणारं, रोरावणारं ते काहीतरी तुझ्या आतून बाहेर पडावं म्हणून वाट बघावी लागत असेल, तर धीर धर.
नाहीच काही घडलं तर मग वेगळी वाट धर.
लिहिलेलं कोणालातरी वाचून दाखवावं लागत असलं..
तर तयार नाहीयेस तू अजून.
नको होऊस लेखक असणाऱ्या शेकडोंसारखा.
आणि स्वत:ला लेखक म्हणवणाऱ्या इतर हजारोसारखा.
नको होऊस कंटाळवाणा. अहंमन्य. स्वप्रेमात संपून गेलेला.
निव्वळ वाचकाच्या जांभईचा धनी.
जोवर अग्निबाणासारखं जळत ते तुझ्या आत्म्यातून झेपावत नाही.
जोवर निष्क्रीय, नि:शब्द राहणं तुला मरणप्राय वाटत नाही.
जोवर तुझ्यातली अंतस्थ धग तुझ्या धमन्या जाळत नाही.
तोवर नको लिहूस.
जर ती वेळ आलीच असेल आणि..
जर तुझी निवड झालीच असेल
तर ते स्वत:च उमटत जाईल तुझ्यातून. तुझ्या आतून.
उमटतच राहील.
तुझं अस्तित्त्व संपेतो.
किंवा मग तुझ्यातलं त्याचं अस्तित्त्व संपेतो.
दुसरा कोणताही मार्ग नाही.
कधी नव्हताच.

Saturday, July 11, 2015

अशीही आणि तशीही

जन्म देता देता जन्म घेणारी
शब्द नि अर्थ जुळवणारी
उंचच उंच गर्दीमध्ये
बोट घट्ट धरणारी
चिंचा, बोरं, भोवरे, चेंडू
गिरगिर, भिरभिर.. खुलणारी
कधी रुजली हे न कळताही
अंगोपांग बहरणारी
कधी अंग चोरून बसणारी
नको असतानाही असणारी
काही आयुष्यभर दिसत, भासत
हुलकावणी देत राहणारी
उणे अधिक मांडता मांडता
हातचा म्हणून राहणारी
अन् ती.. आभाळागत सदैव जागी
फक्त नजरेत सामावणारी
जगणं-बिगणं सुरू असता
'का? कशासाठी?' हे सांगणारी
उतरणीला लागत असता अंधूक झाल्या नजरेपुढे
पुन्हा एकदा उजळत जाऊन विरामाकडे नेणारी
...नाती!

स्त्री असणं ही मर्यादा नव्हेच!

स्वाती पांडे बँकिंग इंडस्ट्रीतील इन्फ़र्मेशन सिक्युरिटी व ईडीपी ऑडिट याविषयातील तज्ज्ञ समजल्या जातात. विशेषतः महाराष्ट्रातल्या सहकारी बँकिंग क्षेत्रात त्यांनी सिस्टिम ऑडिटच्या प्रसार व प्रशिक्षणासाठी केलेलं काम मूलगामी असून त्या क्षेत्राचा चेहरा बदलून टाकणारं ठरलं आहे. ब्रिटिश स्टँडर्ड इन्स्टिट्युट या जागतिक मानांकने बनवणाऱ्या संस्थेने भारतातील 'एलिट ऑडिटर्स पॅनल'वर त्यांना निमंत्रित केले असून या पॅनलवर काम करणारी ही पहिली मराठी महिला आहे. या संस्थेतर्फे भारतातील मोठ्या आयटी कंपन्यांचे इन्फ़र्मेशन सिक्युरिटी ऑडिट केले जाते तेव्हा स्वाती पांडे यांचा त्यात समावेश असतोच. विशेष म्हणजे या क्षेत्रातील त्यांची कारकीर्द त्यांनी वयाच्या पस्तिशीनंतर सुरू केली असून अल्पावधीतच अत्यंत सन्माननीय असे यश मिळवले आहे.
स्वाती यांना मिळालेले काही सन्मान याप्रमाणे-
- Women Entrepreneurs of 21st Century - मुंबई विद्यापीठ (२०१०)
- आदर्श डोंबिवलीकर सन्मान (२०११)
- सकाळ तनिष्का सन्मान - सकाळ वृत्तसमुह (२०१२)
- डी एन एस बँक विशेष सन्मान प्रमाणपत्र (२०१२)
सहकार क्षेत्राला माहिती तंत्रज्ञानाची जोड देत आपला ठसा उमटवणाऱ्या स्वाती पांडे यांच्याशी साधलेला हा संवाद.
----------------------------------------------------------------------------------------
SwatiP
प्र. तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल आणि पहिल्या करियरबद्दल काय सांगाल? 
उ. मी तशी करियरच्या बाबतीत कोणतीही मोठी स्वप्नं नसलेली साधारण विद्यार्थिनी होते. बारावीनंतर (१९८४) मी एक संगणकाचा कोर्स केला. त्या क्लासनंतर मला जाणवलं की हे करण्यात खूप मजा आहे. तेव्हा भारतात नव्यानेच संगणक आले होते. यात मला रस वाटतोय हे लक्षात आल्यावर वडिलांनी मला प्रोत्साहन दिलं आणि वाणिज्य शाखेची पदवी मिळाल्यावर मी मास्टर्स इन कॉम्प्युटर सायन्स ला प्रवेश घेतला. त्यात विशेष नैपुण्य म्हणून संरचनात्मक प्रणालींचे विश्लेषण व आरेखन (स्ट्रक्चर्ड सिस्टिम ऍनालिसिस अँड डिझाइन) हा अभ्यासक्रम केला. तो त्या वेळेस अगदीच नवीन होता. केवळ संगणकाच्या आज्ञावली लिहिण्यापेक्षा एकंदरीत कोणत्याही प्रकल्पाचा अभ्यास करून त्याची सॉफ्टवेअरच्या संबंधातली गरज निश्चित करणं हे आम्हाला त्या अभ्यासक्रमामध्ये शिकवलं गेलं. त्यावेळी कोणत्याही प्रोग्रॅमर्सना हे शिकवलं जात नसे. या क्षेत्रात माणसं कमी होती, आणि त्यावेळची ती गरज होती. त्यामुळे ते अगदी क्लिक झालं. मी पूर्णपणे याच क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. लिपी डेटा सिस्टिम्स मध्ये मी सीनियर प्रोग्रॅमर म्हणून काम सुरू केलं, आणि नंतर तिथल्या स्ट्रक्चर्ड सिस्टिम ऍनालिसिस अँड डिझाईनिंगच्या विभागाची प्रमुख झाले. तिथे मी ८-९ वर्षं काम केलं.
मला नेहमीच नवनवीन गोष्टी शिकण्याची आवड आहे. त्यावेळी संगणक या क्षेत्राचं भविष्य नेटवर्किंगमध्ये आहे, असं लक्षात आलं. मग ऍनालिसिसचं काम करत असतानाच मी सिस्को सर्टिफाइड नेटवर्क इंजिनियरिंगची परीक्षा दिली. त्यातही माझ्या बॅचमध्ये मला बेस्ट रँकिंग मिळालं होतं. एव्हाना मला हे क्षेत्र इतकं आवडायला लागलं की केवळ आवड म्हणून मी हार्डवेअरचाही डिप्लोमा केला. या आवडीमुळेच असं शिकता शिकता मी म्हणजे सॉफ्टवेअर, हार्डवेअर आणि नेटवर्किंग या सगळ्याचं एक पॅकेजच झाले. एक अतिशय आश्वासक अशी करियर माझ्यासमोर उभी होती.
याच सुमारास माझं लग्न झालं, मुलगी झाली. कुटुंबाची गरज म्हणून मी मग नोकरी करणं सोडून दिलं. एक होतं, की पैसा कमावण्यासाठी नोकरी करायलाच हवी असं मला कधीच वाटलं नाही. नोकरी केली नाही तरी मी पैसे कमावू शकेनच ही खात्री मला कायमच होती. मात्र आधीच्या नोकरीत असताना, नंतर घरी असताना आणि त्यानंतरही नेहमीच मी पुढे शिकत राहिले.
माझी मुलगी जेव्हा शाळेत जायला लागली, तिचा दिनक्रम रुळला तेव्हा मग मी एका सहकारी बँकेत माहिती तंत्रज्ञान विभागाची प्रमुख म्हणून रुजू झाले. सहकारी बँकांचं संगणकीकरण हा एक मोठा टप्पा त्यावेळी सुरू झालेला होता. मात्र तिथे सहा महिने काम केल्यानंतर तिथल्या संकुचित वातावरणात आपलं मन रमणार नाही, हे दिसून यायला लागलं. शिवाय ज्या व्यक्तीला माझ्या विषयातलं काही कळत नाही, अशा व्यक्तीच्या हाताखाली काम करणं मला कधीही जमत नाही. हा माझा दोष म्हणा, किंवा गुण.. पण हे असं आहे. या दोनही कारणांमुळे मी ती नोकरी सहा महिन्यातच सोडून दिली. पण आपण एक दरवाजा बंद करतो, तेव्हा अजून कोणत्यातरी खिडक्या आपल्यासमोर उघड्या होत असतात. या नोकरीच्या काळात बँकांसाठीचं इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ऑडिट याचा मला अनुभव मिळाला. त्याचा मी पूर्ण आढावा घेतला. आणि ठरवलं की आपण ही परीक्षा द्यायची आणि यातच पुढे काम करायचं. ते वर्ष होतं २००२.
प्र. बँकेमधली सुरक्षित अशी नोकरी सोडून संपूर्ण करियरच बदलून टाकण्याचा हा निर्णय घेताना तुम्हाला अवघड गेलं नाही का? 
उ. असे धाडसी निर्णय घेताना मी कधीच घाबरले नाही. शिवाय माझ्या घरचे लोकही याबाबतीत माझ्या एक पाऊल पुढेच आहेत. त्यांचा मला कायमच पूर्ण पाठिंबा होता. ही परीक्षा वर्षातून एकदाच होते, आणि अमेरिकेच्या संस्थेकडून सर्टिफाइड इन्फर्मेशन ऑडिटर असं प्रमाणित केलं जातं. तेव्हा त्या परीक्षेची डॉलर्समधली फी भरण्याइतके पैसे माझ्याजवळ नव्हते, ते मी माझे दागिने गहाण ठेवून उभे केले. आणि त्याहीवेळी हे दागिने पुढच्या सहा महिन्यात आपण सोडवून घेणार आहोत, हे पक्कं होतं. त्याच दरम्यान ब्रिटिश स्टॅंडर्ड इन्स्टिट्यूटने (बीएसआय) माहिती तंत्रज्ञानाच्या सुरक्षिततेशी संबंधित '२७००१' हे प्रमाणपत्र द्यायला सुरुवात केली होती. ही एक आंतरराष्ट्रीय मानक प्रमाणित करणारी संस्था आहे. मी तेही करायचं ठरवलं. अशा तऱ्हेने २००३पर्यंत CISA (Certified Information System Auditor) हे (ISACA या) अमेरिकन संस्थेचं आणि ISO 27001 हे बीएसआयचं अशी दोन्ही सर्टिफिकेट्स मी मिळवली होती!
प्र. तिथून पुढे प्रत्यक्ष कामाला सुरुवात कशी झाली? 
उ. आता पुढे काय, हा विचार करत असतानाच माझ्या नवऱ्याची डॉक्टर तराळेंची ओळख झाली. ते महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक्स असोसिएशनचे प्रमुख कार्यकारी अधिकारी होते. मी सरांना भेटले तेव्हा त्यांनी सांगितलं, की आमच्या सहकारी बँकांनाही इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ऑडिटची गरज आहे. त्या वेळी एका बँकेला तातडीने ऑडिटरची गरज होती आणि नेमलेला ऑडिटर ठरल्याप्रमाणे तिथे गेला नाही. तेव्हा सरांनी मला विचारलं. मग माझ्या निवडप्रक्रियेचा भाग म्हणून माझं एक व्याख्यान ठेवलं गेलं, एका परिषदेत मध्ये प्रेझेंटेशन देण्यासाठी मी अमरावतीलाही जाऊन आले. या दोन्ही टप्प्यात मी समाधानकारक कामगिरी केली आणि अशा तऱ्हेने बँकेच्या लेखा परीक्षणाची पहिली संधी मला मिळाली!
एका महिन्याच्या अवधीत घडलेल्या या घटना म्हणजे माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट होता. तोवर मी स्वाती पांडे म्हणून मी काय करत होते, तर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सर्वसामान्यपणे काम करणारी इतर अनेकांसारखीच एक बाई होते. इथपर्यंत माझा प्रवास हा 'आवडतंय तर करून बघू' या विचाराने सुरू होता. माझ्या वाटा शोधण्याचा प्रयत्न करत होते. आपल्याला कशात गती आहे, किंवा आपल्या क्षमता नेमक्या काय आहेत, हे समजून घ्यायला माझ्या वयाची पस्तिशी यावी लागली. काही काही लोक फार नशीबवान असतात, ज्यांना खूप लवकर आपल्या गुणांचा शोध लागतो. पण माझ्या बाबतीत प्रशिक्षण कौशल्य, मनुष्यबळ व्यवस्थापन, नियोजन, काम करून घेणं हे मला तसं उशीरानेच कळलं. त्यासाठी मला या संघटनेमध्ये येण्याची वेळ यावी लागली. या संधीनंतर माझ्यातल्या अनेक क्षमतांची मलाच ओळख होत गेली.
प्र. या कामाचं स्वरूप कसं आहे? तुमच्या अनुभवांबद्दल सांगा. 
उ. मी जे काम करते ते थोडंसं वेगळं आहे. लोकांच्या पटकन लक्षात येत नाही.
आमची संघटना शहरी तसं जिल्हास्तरीय सहकारी बँकांसाठी काम करते, ५०० हून अधिक सभासद बँकांच्या उत्कर्षासाठी काम करणं ही संघटनेची जबाबदारी आहे. ही ना नफा तो तोटा तत्त्वावर काम करणारी संस्था आहे. बँकांच्या गरजेनुसार त्यांना लागेल ती मदत करणं हे आमचं काम. माहिती तंत्रज्ञान संदर्भातलं लेखापरीक्षण हा माझ्या कामाचा भाग. २००५ मध्ये मी हे काम सुरू केलं तेव्हा मला कोणाचंही मार्गदर्शन नव्हतं. इतकंच कशाला आजही या क्षेत्रात फारशी माणसं नाहीतच. या क्षेत्रात बायकांची संख्या तर आजही शून्य आहे. बँक कर्मचाऱ्यांमध्येही बायकांची संख्या अगदीच नगण्य आहे. असं सगळं असताना गेली दहा वर्षं महाराष्ट्राच्या प्रत्येक खेड्यापाड्यापर्यंत जाऊन असोसिएशनशी निगडित असलेल्या ५०० हून अधिक बँकांच्या शाखांची सिस्टिम ऑडिट्स मी करते आहे. आतापर्यंत या कामासाठी मी दीड लाख किलोमीटर्सचा प्रवास केला आहे. वडिलांकडून आम्हाला मिळालेला एक मोठा वारसा म्हणजे फिरण्याची आवड. दुसरं म्हणजे माणसांशी संवाद साधणं. याचा उपयोग मला माझ्या कामात फारच झाला.
या काळात मी खूप अनुभव घेतले. सगळ्या महाराष्ट्रात विभागांमध्ये पार सिंधुदुर्गापासून ते गडचिरोलीपर्यंत फिरले. माझ्या कामाची व्याप्ती ही नुसती ऑडिटपुरती नसून वेळप्रसंगी भामरागड, गडचिरोली या अत्यंत दुर्गम आणि नक्षलग्रस्त अशा भागातल्या शाखेला कनेक्टिव्हिटी देण्यासाठी आवश्यक ती लाइन टाकून घेणं, तिथल्या जंगलातून ती शाखेपर्यंत आल्यानंतर चाचणी करणं आणि मग ऑडिट करणं हेही करावं लागलं. ग्रामीण भागात आजही याबाबतीत फारशी सजगता नाही. त्यामुळे त्या त्या बँकेत गेल्यानंतर आधी तिथे एक व्यवस्था निर्माण करणं, त्या लोकांना मूलभूत प्रशिक्षण देणं, हे केल्यानंतरच माझं ऑडिटचं काम सुरू होऊ शकायचं. त्यानंतर शेवटच्या बैठकीत संचालक मंडळ किंवा अध्यक्ष यांना तोवर केलेलं काम समजावून द्यायचं, असा क्रम असायचा.
प्र. सहकारी बँकिंग हे क्षेत्र महाराष्ट्रात बरंच विस्तृत, तरीही काहीसं विस्कळित आहे. या बाबतीत काय सांगाल? 
उ. पंतप्रधानांची जनधन योजना ही आज चर्चेत आहे. पण गेली अनेक दशकं अगदी अर्थव्यवस्थेच्या तळाशी असणाऱ्या अशिक्षित/अल्पशिक्षित ग्रामीण सामान्य माणसाला भांडवल पुरवण्याचं, आर्थिक बळ द्यायचं काम सहकारी बँक करतेच आहे आणि अधिक जिव्हाळ्याने करते आहे. या बँका कधीच्याच तळागाळापर्यंत पोचलेल्या आहेत. इथे उणीव असलीच तर ती आहे ब्रँडिंगची आणि कॉर्पोरेट क्षेत्रातल्या विचारांची. मी स्वतः कॉर्पोरेट ते कोऑपरेटिव्ह हा जो प्रवास केला, त्यात मी त्या क्षेत्रामध्ये शिकलेल्या गोष्टी जर इथे आणून शकले, तर हादेखील एक सुदृढ उद्योग म्हणून उभा राहू शकतो.
याचबरोबर सहकारी तत्त्वावर चालणाऱ्या बँकांच्या काही उणीवाही आहेत, पारंपरिक पद्धतीने चालणारं बँकिंग, बदलांसाठी अजूनही दिसणारी अनिच्छा, इथे असलेल्या अपप्रवृत्ती, शिवाय स्थानिक राजकारण्यांचा असलेला फार मोठा दबाव आणि आर्थिक प्रभावही, विलफुल डिफॉल्टर्सची मोठी संख्या, या सगळ्यामुळे या क्षेत्रामध्ये सुधारणा आणणं फार कठीण होतं. यांची काम करण्याची पद्धत शहरात दिसून येते तशी नाही. याचं एक कारण हेही आहे, की इथे काम करणारा वर्ग हाच मुळी तुलनेने कमी शिकलेला आणि ग्रामीण जीवनशैलीतला आहे. त्याच्यासाठी त्याचं गाव, त्याची शेती, घर, कुटुंब यानंतर नोकरीचा क्रम लागतो. तो फार हुशार नाही, ही सत्य परिस्थिती आहे, तसं नसतं तर तो एखाद्या राष्ट्रीयीकृत किंवा खाजगी बँकेतच नोकरीला गेला असता! हे सगळं समजून त्यांच्याबरोबर व्यवहार करता येणं गरजेचं आहे.
या क्षेत्रातल्या अज्ञानाचा फायदा करून घेत दरम्यानच्या काळात अनेक बड्या माहिती तंत्रज्ञान कंपन्यांनी संचालकमंडळीना हाताशी धरून आपापली सॉफ्टवेअर्स या बँकांना विकली. मात्र त्यांचा उपयोग करण्याचं नीटसं प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना दिलं गेलं नाही. त्यामुळे केवळ करोडो रुपयांचा खर्च झाला, कागदावरचे व्यवहार संगणकात गेले, मात्र त्याचा व्यवसायाच्या वाढीसाठी कोणताही उपयोग झाला नाही. या आयटी कंपन्यांचा हा नफेखोरीचा विळखा सोडवण्यासाठीही असोसिएशनच्या माध्यमातून आम्ही खूप काही केलं, जागृती घडवून आणायचा प्रयत्न केला.त्यासाठी या कंपन्यांकडून आलेलं सर्व प्रकारचं दडपण, धमक्या यांना तोंडही दिलं. मात्र हार न मानता आम्ही पाठपुरावा करत राहिलो, आणि सभासद बँकांसाठी माहिती तंत्रज्ञान मंच स्थापन केला. या क्षेत्राची समजून घेऊन त्याप्रमाणे त्यांना सॉफ्टवेअरच्या निवडीचं मार्गदर्शन करणं, त्याचे परवाने मिळवण्यासाठी इंग्रजीतून कागदपत्रं तयार करायला मदत करणं, नवनवी माहिती त्यांच्यापर्यंत पोचवत राहणं, त्यांच्यासाठी या विषयावरची चर्चासत्रं आयोजित करणं हे सगळं या मंचाच्या माध्यमातून आम्हाला करता आलं.
प्र. म्हणजे एव्हाना निव्वळ "माहिती तंत्रज्ञान लेखा परीक्षक" म्हणून स्वतःचा सहभाग मर्यादित न ठेवता तुम्ही सहकारी बँकिंगच्या इतरही बाजूंच्या विकासाकडे लक्ष द्यायला सुरुवात केली होती. 
उ. होय. याचं श्रेय बऱ्याच अंशी मी संघटनेला आणि विशेषतः डॉ तराळेंना देईन.
या सगळ्या काळात सहकारी बँकिंगची क्षमता लक्षात आल्यावर मग सरांनी आणि मी पुढचा निर्णय घेतला. आम्ही हळूहळू आधुनिकता, तंत्रज्ञान, आणि संशोधन या गोष्टींवर भर द्यायला सुरुवात केली. डॉक्टर तराळेंची बँकिंग विषयातली डॉक्टरेट आणि माझं माहिती तंत्रज्ञान विषयातलं प्रावीण्य यांची सांगड घालत आज संघटनेलाच नव्हे, तर सहकारी बँकिंगलाही आम्ही एका नव्या टप्प्यावर घेऊन चाललो आहोत. बीएसआयकडून गुणवत्ता व्यवस्थापनाचंही एक प्रमाणपत्र दिलं जातं, आम्ही ते आमच्या सहकारी बँकांसाठी करायचं ठरवलं. त्यासाठी पुन्हा मी अभ्यास करून ते सर्टिफिकेटही मिळवलं. आता बीएसआयसाठीही मी ऑनररी लीड असेसर म्हणून काम करतेय. त्यांच्यासाठी एचपी, ऍक्सेंच्युअर, कॅपजेमिनीपासून अनेक ऑडिट्स केली आहेत. परिणामी, सहकारी बँकेचा अगदी बारीक सारीक गोष्टींचा अभ्यास, आणि त्याचवेळी अत्यंत प्रतिष्ठित अशा या कंपन्यांमध्ये काम करण्याचा अनुभव या दोन्ही गोष्टी मी एकाच वेळी साध्य करू शकले. या अनुभवाचा वापर मी अर्थातच माझ्या क्षेत्रातही करत गेले.
मला मिळालेली माणसं ही माझ्यासाठी फार मोठी जमेची बाजू आहे. मग ते माझे सर असोत, माझ्या कुटुंबातली माणसं असोत, की गावोगावी माझ्यासोबत काम करणारे माझे सहकारी असोत. सरांकडून पूर्ण विश्वासाने दिल्या गेलेल्या संधी, घरच्यांचं, माझ्या नवऱ्याचं प्रोत्साहन आणि माझ्या बँक कर्मचाऱ्यांचं सहकार्य या तीनही गोष्टींनी एवढी प्रगती साधणं शक्य करून दिलं आहे.
प्र. तुमचं कार्यक्षेत्र हे १००% पुरुषांचंच आहे, असं तुम्ही म्हणालात. विशेषतः ग्रामीण भागातल्या पुरुष कर्मचाऱ्यांसोबत काम करताना एक स्त्री म्हणून तुम्हाला आलेले अनुभव कसे आहेत? 
उ. ऑडिटला जाताना माझी टीम ही पूर्णपणे तीन चार तिथले स्थानिक कर्मचारी आणि मी अशी असते. एक स्त्री म्हणून मी खात्रीपूर्वक सांगेन की जेव्हा तुम्ही तुमचं बाईपण दाखवायला लागता, तेव्हा समोरचाही तुमच्याकडे त्याच नजरेने बघायला लागतो. तुमची कामाशी असलेली बांधिलकी, तुमचा कणखर आत्मविश्वास आणि तुमची देहबोली या तीन गोष्टींवर तुमची प्रतिमा निश्चित होत असते. यातूनच आपोआप तुमच्याभोवती तुम्ही एक चौकट निर्माण करत असता. मग ती चौकट ओलांडण्याचं धाडस समोरचा पुरुष करू बघत नाही, या मॅडमशी किती सलगी करावी हे त्यांचं त्यांना समजत जातं. आणि त्यातूनच निव्वळ स्त्रीपुरुष म्हणून संबंध न उरता गावोगावच्या सगळ्या मंडळींशी माझे अतिशय सुदृढ असे सहकर्मचाऱ्यांचे, मैत्रीचे संबंध तयार होत गेले.
स्त्री असण्याचाच अजून एक भाग आहे, तो म्हणजे प्रकृतिस्वास्थ्य. गेल्या दहा वर्षांत झालेल्या एकूण प्रवासाचा अर्थातच माझ्या प्रकृतीवर परिणाम झालाच. गावोगावी फिरत असताना बँकेत स्त्री कर्मचारीच नसल्याने, किंवा बँकच चक्क गोठ्यात किंवा अशा अडनिड्या जागी असल्याने स्त्रियांसाठी शौचालयाची सोय नसणं हाही फार मोठा त्रासाचा विषय होता. मग अशा वेळी दिवसभर पाणीच प्यायचं नाही, असं करावं लागायचं. पण हळूहळू विचार केला, की हे आपल्यासाठी चांगलं नाही. मग मी सोबतच्या बँकेच्या माणसाला किंवा ड्रायव्हरला आधीच सांगून ठेवायला सुरुवात केली. गरज पडली की त्यांच्या घरी जावं लागायचं. पाठदुखी, स्पाँडॅलिसिस, बीपी याचाही त्रास मला झाला. त्यासाठी मी गेल्या काही वर्षांपासून योगासनं करायला सुरुवात केली, त्यांचा मला खूप उपयोग होतोय. संपूर्ण शाकाहार, आणि मिताहार यानेही मला खूपच उपयोग होतो.
प्र. या फारशा माहीतही नसलेल्या पुरुषप्रधान क्षेत्रात, अनेक मूलभूत अडचणींना सामोरं जाऊन प्रचंड मोठा प्रवास करून, गेली दहा वर्षं तुम्ही यशस्वीपणे हे काम करत आहात. हे कशामुळे साध्य झालं असं तुम्हाला वाटतं? 
उ. समोर येईल त्या परिस्थितीत काम पूर्ण करायचं, त्यासाठी आवश्यक ते निर्णय तिथल्या तिथे घ्यायचे, अडचण आली तरी हातपाय गाळून न बसता, रडत न राहता स्वतः मार्ग काढायचा, हीच माझी काम करण्याची पद्धत आहे. आणि माझ्या या स्वभावाचं श्रेय माझ्या वडिलांना आहे. नोकरीच्या निमित्ताने वडिलांना अनेक वर्षं महाराष्ट्राबाहेर काढावी लागली. त्यांची व्यवस्था पाहण्यासाठी, कधी त्यांना आजारपण आलं म्हणून आईला अनेकदा त्यांच्या नोकरीच्या गावी जावं लागत असे. धाकटी भावंडं माझ्यापेक्षा सात आठ वर्षांनी लहान, त्यामुळे कायमच मोठेपणाचा अधिकार हा माझ्यात सुरुवातीपासून होताच. आईवडीलांनीही मला सगळ्या प्रकारचे अनुभव घेऊ दिले, म्हणजे अगदी सातवी-आठवी पासूनच बँकेत पैसे भरणं, काढणं, बिलं भरणं, आई इथे नसताना दोघा भावंडांना सांभाळणं हे सगळं मी करत होते. त्या वयातला एक प्रसंग मला आठवतो. आठवीत असताना माझ्या गळ्यापाशी एक गाठ आली होती, आणि ती शस्त्रक्रिया करून काढून टाकायची होती. मला आदल्या दिवशी रुग्णालयात दाखल केलं. रात्रभर आई माझ्यासोबत राहिली, आणि घरचं आवरून येण्यासाठी सकाळी परत गेली. ती येईपर्यंत माझ्याजवळ थांबण्यासाठी वडील घरून निघाले होते. ते पोचण्याआधीच सर्जन राउंडवर आले, आणि त्यांनी मला विचारलं, आई बाबा कुठे गेलेत? मला आत्ता वेळ आहे, मी तुझं ऑपरेशन करू का? नाहीतर नंतर दुपारी तीन वाजता तुझा नंबर येईल. तेव्हा मी उत्तर दिलं, चालेल, तीन वाजेपर्यंत थांबण्यापेक्षा तुम्हाला आता वेळ आहे, तर तुम्ही माझं ऑपरेशन करा आत्ताच! थोड्या वेळाने वडील पोचले, त्यांनी विचारलं, इथे माझी मुलगी होती ती कुठे आहे? तेव्हा स्टाफने सांगितलं, तिला ऑपरेशन साठी नेलंसुद्धा.. डॉक्टर आणि वडील दोघंही थक्क झाले होते.. पण माझ्या मनात किंचितही भीती नव्हती, की माझ्यासोबत कोणी नाही, मग मी काय करू?
माझ्या या स्वभावाला वडिलांनीही नेहमी प्रोत्साहनच दिलं. मुलगी असल्यामुळे कधीच कोणतीही बंधनं आम्हा बहिणींवर त्यांनी घातली नाहीत. किंबहुना आम्हा भावंडांमध्ये वाचन, भटकंती, चांगले कार्यक्रम पाहणं अशा आयुष्यभर सोबत करणाऱ्या उत्तम आवडी निर्माण केल्या. चांगलं आणि वाईट यामधला फरक फार समर्पकपणे आम्हाला नेहमीच दाखवून दिला. या सगळ्यामुळे मी आज अनेक गोष्टींचा मी आस्वाद घेऊ शकले. आपल्या सभोवती घडणाऱ्या गोष्टींशी स्वतःला जोडून घेत राहिले. सुरुवातीला मी म्हटलं तसं मला माझी स्वतःची ओळख होण्यासाठी वयाची पस्तिशी यावी लागली. मात्र तोवर मी सतत नवनव्या गोष्टी करून बघत राहिले, शिकत राहिले. यासाठी तुम्ही फार बुद्धिवान असण्याची गरज नसते, तर अल्पसंतुष्ट न राहता स्वतःला नवनव्या संधी मिळवून देण्याची गरज असते. अजूनही मी चाकोऱ्या निर्माण न करता शिकते आहेच.
प्र. थोडक्यात ज्यावेळी असलेल्या नोकरीत जम बसवून निवांत आयुष्य जगण्याचे बेत केले जातात त्या वयात तुमची ही सेकंड इनिंग सुरू झाली. इतकंच नाही, तर कुटुंब आणि करियर यांचं उत्तम संतुलन तुम्ही जमवलं आहे, हे कशामुळे शक्य झालं? 
उ. मला आवर्जून असं सांगावंसं वाटतं, की या क्षेत्रात वावरताना, किंबहुना कुठेही वावरताना स्त्री म्हणून कोणत्याही खास सवलती मागणं किंवा मर्यादा घालणं हे दोन्ही करू नये. स्त्रीकडे मुळातच व्यवस्थापन ही कला जन्मतःच असते. ही कला घरच्या दैनंदिन जीवनापासून ते ऑफिसच्या कामापर्यंत सगळीकडे आवश्यक आणि उपयोगी ठरते. माझं कामाचं स्वरूप हे इतकं वेळ मागणारं आणि कष्टाचं असलं तरी मलाही घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतातच. भाजी आणणं, चटण्या-कोशिंबिरींपासून घरचं जेवण करावं लागणं, माझी मुलगी, जी आज वीस वर्षांची आहे, तिचं, माझ्या नवऱ्याचं खाणंपिणं सांभाळणं, हे सगळं मला करावं लागतंच. एवढ्या सगळ्या गोष्टी कोणताही गोंधळ न होऊ देता पार पाडायच्या तर पूर्वनियोजन ही त्याची फार मोठी किल्ली आहे.
उदाहरणच द्यायचं तर माझ्या घरी दर वर्षाआड गौरी-गणपती असतात, त्या दिवशी अनेक प्रकारचे पदार्थ करायचे असतात. या सगळ्यांचं माझं प्लॅनिंग आठ दिवस आधीपासून झालेलं असतं. मग त्यात त्या दिवशीचा मेन्यु, त्याला लागणारं सामान, त्या त्या पदार्थासाठी लागणारा वेळ, कोणत्या क्रमाने पदार्थ करावेत, त्यासाठी मी सकाळी किती वाजता उठायला हवं, या सगळ्याचा येणार असलेला खर्च हे सगळं मी चक्क लिहून काढते. या प्रकारे काम केल्याने मला कसलाच ताण येत नाही, आणि पंधरा वीस जणांचं जेवणही मी सहज करू शकते. आता हीच पद्धत मी माझ्या ऑफिसमध्येही वापरते. ऑफिस हे माझ्यासाठी माझ्या घराचं एक्स्टेंशनच आहे. त्यामुळे इथल्या सगळ्या गोष्टींमध्येही इतक्याच मनापासून स्वतःला गुंतवून घेते, त्याची जबाबदारी घेऊन त्या त्या गोष्टी पार पाडते.
आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी कराव्याश्या वाटतात तर त्यांची, आपल्या निर्णयांचीही जबाबदारी हवी. ती घ्यायला बऱ्याचशा स्त्रिया घाबरतात. त्यातल्या अपयशाच्या शक्यतेला, किंवा त्रासांना घाबरून त्या गोष्टी न करण्यासाठी कारणं शोधतात. मुलं मोठी झाल्यानंतर गृहिणीला येणारं रिकामपण, निराशा हे तर खूपदा दिसून येतं. मात्र जिच्या मनात खरोखरच इच्छा असेल, तिला तिचे मार्ग सापडतातच, त्यासाठी लागणारं वेळेचं व्यवस्थापन कोणतीही कारणं न देता आपलं आपण करायचं असतं. आपला मार्ग आपण शोधायचा. आपल्या घराशी आपली जेवढी बांधिलकी असते, तेवढीच आपल्या कामाशीही असायला हवी, स्वतःच्या विकासाशीही असायला हवी. माझ्या मागे काय राहील? तर माझ्या कामाचा ठसा राहील. त्यामुळे तो वादातीत राहील, हे मी बघायलाच हवं.
माझ्या आयुष्यात आम्ही खूप खडतर काळ पाहिला, नवऱ्याचा व्यवसाय नवीन असताना आर्थिक आघाडीवरही खूप संघर्ष केला. पण या संपूर्ण काळात मी जे काही केलं ते ते पूर्णपणे झोकून देऊनच केलं, मनापासून, आनंदाने केलं. संबंध जपले, माणसं जोडली. त्यामुळेच माझ्या घरच्यांना, माझ्या सासूसासऱ्यांना आज माझ्याबद्दल अभिमान वाटतो, जिव्हाळा वाटतो. एरवीही घरची स्त्री घरगुती जबाबदाऱ्या पार पाडण्यामध्ये कमी पडत नसेल, तर एका मर्यादेपलीकडे घरच्यांचाही विरोध राहत नाही. घरातलं वातावरण आणि कामाच्या ठिकाणचं माझं यश या गोष्टी परस्परांवर अवलंबून आहेत, आणि त्या दोन्हीला योग्य ते महत्त्व देणं हे स्त्री म्हणून मी करायलाच पाहिजे. हेच तर स्त्रीत्व आहे, नाही का?
प्र. यापुढचा तुमचा प्रवास कसा असेल? 
उ. माझ्यासाठी हे सोशोइकॉनॉमिक महत्त्व असलेलं क्षेत्र आहे. ज्यांचा शिक्षणाशी, तांत्रिक प्रगतीशी काहीही संबंध नाही, अशा लोकांनाही बँकेच्या सर्व्हिसेसचा लाभ मिळवून देणं, मग ते बायोमेट्रिक एटिएम मशीन असो, फक्त आठवडी बाजाराच्या दिवशी गावात जाणारं पोर्टेबल एटिएम मशीन असो, किंवा बँकेच्या सगळ्या शाखा जोडून घेतल्याने प्रत्येकाला कामाचा संपूर्ण मोबदला स्वतःच्या खात्यात कोणत्याही मध्यस्थाविना मिळणं असो, हे मला या कामातून साधता येतंय. आता यातला आणखी तपशील सांगायचा तर तेंदुपत्ता तोडणाऱ्या किंवा जंगलावरच उपजीविका करणाऱ्या आदिवासी माणसासाठी एटिएम कार्ड, पिन नंबर, त्यावरचे आकडे हे सगळं कदापिही उपयोगाचं नाही. अशा ठिकाणी आम्ही बायोमेट्रिक एटिएम मशीन तयार करून दिली. मग त्यासाठी त्यांचे दहाही बोटांचे ठसे घेणं, ते नियमितपणे घेऊन डेटा अद्ययावत करत राहणं हे सगळंच त्यात आलं. महिला बचत गटांनाही जिल्हा सहकारी बँकांच्या माध्यमातून आम्ही मार्गदर्शन करू शकलो. अशा अनेक गोष्टी आहेत.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सहकारी बँकेच्या खातेदाराच्या गरजा या शहरी माणसापेक्षा संपूर्णपणे वेगळ्या आहेत. पण तसं असलं, तरी या तंत्रज्ञानावर, त्यातल्या सुविधांवर त्यांचाही तितकाच अधिकार नाही का? हे लक्षात घेऊन तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेत कमीत कमी खर्चात अत्याधुनिक बँकिंग सर्व्हिसेस देऊ शकेल, असं सहकारक्षेत्र विकसित करणं, आणि यासाठी ज्यांना या क्षेत्राची यथातथ्य माहिती आहे असे याच क्षेत्रातले लोक मी तयार करेन. हेच माझं यापुढच्या काळातलं ध्येय असेल.

नक्षी

तिची पाठ दरवाज्याकडे होती. स्वतःच्याच तंद्रीत ती खिडकीबाहेर पाहत होती. समोरचा बगिचा आता बर्फाच्या चादरीतून बाहेर पडून उमलायला लागला होता. आता या झाडांना पानं फुटतील, मग कळ्या येतील, त्या उमलतील.. माझ्या स्वप्नांसारख्याच! तिचे विचार सुरूच होते. होय. अजूनही तिच्या मनात कळ्या, फुले, पाने, चंद्र, सूर्य, तारे असे प्रेमकवितांमधले शब्द येत असत. पांढराशुभ्र घोडा, रुबाबदार राजकुमार, गोंडस मुलंबाळं, सुंदर सजलेलं घर, नोकरचाकर या कल्पनाविश्वात रमणं हा तिच्या दिनक्रमाचा भाग होता. जेमतेम १९ ची तर होती नेली जोनॅथन...
neli
चित्रः आनन्दिता
खिडकीतून बाहेर पाहत असतानाच ती हातातल्या भिंगाशी चाळा करत होती. तिथेच पडलेल्या नक्षीदार रुमालाने तिने भिंगाची काच स्वच्छ केली. तो रुमाल कसा विणायचा ते एमिलीने शिकवलं होतं तिला. तिच्या स्वप्नातल्या घरात असे सुंदर नक्षीचे कितीक रुमाल होते.. एमिलीला असं बरंच काही काही येत असे. सुंदर केशरचना कशी करावी, स्वतःला कसं सजवावं, चवीपरीचे केक्स कसे बनवावे.. आह! लग्नानंतर दूरच्या गावात गेलेल्या मैत्रिणीच्या विचाराने नेलीने उसासा टाकला. तिने पुन्हा भिंग हातात घेतलं आणि रुमालावरची सुबक नक्षी भिंगातून निरखायला सुरुवात केली..
त्या भिंगातून आरपार पाहतापाहता तिला एक घर दिसू लागलं. घराच्या व्हरांड्यात एक तिशीचा माणूस आरामखुर्चीत बसला होता. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव कसे होते ते नेमकं सांगता यायचं नाही. एकाचवेळी तो वैतागलेला आणि कंटाळलेला वाटत होता. त्याच्या आजूबाजूला दोन लहान मुलं खेळत होती. खेळणं कसलं.. गोंगाटच सुरू होता. त्यांच्या आवाजाने त्रासून अखेर त्या माणसाने जोरात हाक मारली. नेलीला नीटसं ऐकू आलं नाही, पण त्या आवाजाने घरातून एक बाई बाहेर आली. तिच्या कडेवर अजून एक तान्हं मूल होतं. जराशी स्थूल दिसत होती. तिचा पोशाख, केस, चेहरा काहीच ओळखीचं वाटेना.. तिचा चेहरा मात्र नेलीला ती आरशात पाहताना दिसत असे, तसा वाटला.. खरंच की! नेलीच होती ती! मग तो माणूस? ती मुलं? ओहो...!
बाहेर येऊन तिने त्या दोघा मुलांना उगाचच रागावल्यासारखं केलं. घरकाम आटपता आटपता मध्येच बाहेर यावं लागल्याने खरंतर तिची चिडचिडच झाली. आता बाहेर आलोच आहोत तर नोकराने घोड्यांना चारापाणी केलंय का ते बघून घ्यावं म्हणून ती पागेकडे वळली. तिला तिथे जाताना पाहून त्या माणसालाही आठवलं की बग्गीची डागडुजी करायला हवीय. मनाविरुद्धच तो खुर्चीतून उठला.
कसा कोण जाणे, पण त्या घरातला तिचा दिवस न संपणारा आणि रात्र न उजाडणारी होती! सगळ्या दिवसभराला पुरून उरतील अशी मुंग्यांची रांग लागावी तशी कामं सामोरी येत असत. कितीही वेळ गेला तरी ती रांग तशीच. न संपणारी. पागेची, घोड्यांची देखरेख करत असतानाच तिला आठवलं, दोघा मुलांना औषध द्यायची वेळ झाली होती. दोघांनाही सतत सर्दी, खोकला नाहीतर पोटाची तक्रार सुरूच असे. शिवाय सगळ्यात धाकटं तर अजून रांगायलाही लागलं नव्हतं. तिला आठवलं, रात्रभर जागरण करून आता ते तिच्या खांद्यावर गाढ झोपी गेलं होतं. तिला हेही आठवलं, की असं गाढ झोपल्याला तिला कैक वर्षं होऊन गेली होती...
ती पुन्हा घरात शिरली. आत शिरताच सगळ्या घराचे एकुणेक कोपरे तिला हाका मारत आहेत, असं तिला वाटायला लागलं. दिवाणखान्यातल्या फुलदाणीतली कोमेजलेली फुलं, आतल्या खोलीतल्या मेजावर पडलेला तऱ्हेतऱ्हेचा पसारा, स्वयंपाकघरातली भांडी, मागच्या व्हरांड्यात येऊन पडलेल्या मळ्यावरच्या भाज्या, न्हाणीघरात धुऊन ठेवलेले वाळत घालायचे असलेले कपडे! निर्जीव मनाने ती तो कोलाहल ऐकत राहिली.
कडेवरचं मूल चुळबूळ करू लागलं तसं ती त्याला झोपवण्यासाठी आतल्या खोलीत गेली. तिथल्या पलंगावर त्याला ठेवून माघारी वळताना खिडकीपाशी असलेल्या मेजावर चमकणाऱ्या वस्तूने तिचं लक्ष वेधून घेतलं. भिंग.. थबकून ती तिथल्या खुर्चीवर टेकली. ते भिंग हातात घेऊन त्यातून आरपार पाहता पाहता तिला फार पूर्वी पाहिलेली एक खोली दिसू लागली...
... त्या खोलीच्या खिडकीशी बसलेली एक तरुण मुलगी अविश्वासाने तिच्याकडे पाहत होती!

(पूर्वप्रकाशित)

Friday, October 31, 2014

माझा कॅनव्हास.. अर्थात जोहॅनसची गोष्ट.

२०१२ सालचा जुलै महिना. ऑस्ट्रियामधल्या प्योर्टशाख इथे जगभरातले कलाकार जमले होते. तिथे उभारलेल्या मोठ्या मंचावर आमच्या सर्वांच्या कलाकृती सादर करून झाल्या होत्या. निकालाची वेळ जवळ येत होती. तिसर्या आणि दुसर्या क्रमांकाचं पारितोषिक जाहीर झालं आणि विजेतेपदासाठीची घोषणा करण्यात येऊ लागली.. "आणि यंदाचा आपला विश्वविजेता ठरला आहे... जोहॅनस स्टॉयटर!!"


सगळीकडे एकच जल्लोष सुरू झाला, मी धावत मंचावर गेलो, ट्रॉफी स्वीकारली.. डोळ्यांपुढून मात्र गेल्या एका तपाच्या आठवणी सरकून जात होत्या!
मी. एक आर्टिस्ट. निर्जीव कॅनव्हासवर रंगाचे फटकारे मारून चित्र जिवंत करणं हे कलाकाराचं काम. पण माझा कॅनव्हास निर्जीव नाही. जिवंत आहे. कारण मी आहे एक बॉडीपेंटिंग आर्टिस्ट!
इटलीमध्ये मी जन्माला आलो आणि ऑस्ट्रियामध्ये माझं औपचारिक शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण घेताघेताच वेगवेगळ्या कलाही शिकून घेत होतो. पण तरीही नेमकं कोणतं क्षेत्र निवडावं, हे अजून पक्कं ठरत नव्हतं. अशातच एक दिवस शारीर रंगलेपन हा कलाप्रकार मला पाहायला मिळाला. आतापर्यंत मी पाहिलेली चित्रं कागदावर, कापडावर, काचांवर काढलेली होती. पण सजीव मानवी शरीराचाच कॅनव्हास बनवायचा..! हे काही वेगळंच होतं. नवं होतं. आणि करून पाहायलाच हवं असं वाटायला लावणारं होतं. २००० साली मी पहिल्यांदा बॉडी पेंटिंग करून पाहिलं. अनेक तास खर्चून केलेल्या त्या रंगकारीने मला अखेर माझी दिशा दाखवून दिली.

मी नेमकं काय करतो, हे समजून घेण्यासाठी शारीर रंगलेपन नेमकं काय आहे हे थोडक्यात सांगतो. चेहरा आणि इतर अवयव वेगवेगळ्या रंगांनी रंगवणं ही कला माणसाने आदिम संस्कृतीपासून जोपासली आहे. विसाव्या शतकाच्या मध्यावर जेव्हा न्युडिटीचा प्रसार, प्रचार होऊ लागला तेव्हा हे शारीर रंगलेपन नागरी जीवनामध्येदेखील शिरलं. तर्हतर्हेचे रंग, आकृत्या वापरून शरीर सजवणं हे वाढत्या प्रमाणात दिसून यायला लागलं. सर्जनशीलता व्यक्त करण्यासाठी उत्सुक असलेल्या त्यावेळच्या तरुण पिढीला हा एक नवाच, अपारंपरिक मार्ग आकर्षक वाटला नसता तरच नवल! चेहऱ्यावर, शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर काढलेली मोजकेच तास टिकणारी शारीरचित्रं, थोडा अधिक काळ टिकणारे किंवा कायमस्वरूपी असलेले टॅटूज असे अनेक प्रकार तरुण मंडळी शरीरावर मिरवू लागली.


त्यापैकी बॉडी पेंटिंगमध्ये खूप प्रयोग होत गेले. मी या क्षेत्रात पहिल्यांदा शिरलो, तोवर संपूर्ण शरीर कॅनव्हाससमान मानून एखादी संकल्पना मांडण्यासाठी ते रंगवणं रूढ होत होतं. मीही अशीच सुरुवात केली. कसं करतो मी हे काम? तर सर्वप्रथम मला ज्या कल्पनेवर काम करायचंय ती सुस्पष्ट करून कागदावर मांडणं. दुसर्या टप्प्यात माझ्या कल्पनेला प्रत्यक्षात आणू शकेल अशा मॉडेलचा शोध घेणं, तिला/त्याला चित्रविषय योग्य तर्हेने समजावून देणं. आणि अखेर प्रत्यक्ष रंगकाम करणं. या सगळ्याला काही आठवड्यांपासून काही महिन्यांपर्यंतचा वेळ द्यावा लागतो.
सर्वसाधारण चित्र रंगवण्यापेक्षा हा प्रकार खूप वेगळा आहे. कारण माझं माध्यम आहे माणसाची त्वचा. जी संवेदनशील, मऊ आणि उष्ण असते. जिवंत असते... चित्रासाठी वापरलेले रंग हे अनेक तास त्वचेवर राहतात, त्यामुळे ते त्वचेला हानी पोहोचवणारे नसतील अशा तर्हेचेच निवडावे लागतात. रंग स्वच्छ करण्यासाठीही तशीच सुरक्षित द्रव्यं आम्ही वापरतो. अत्यंत महत्त्वाचा असा दुसरा भाग असतो मॉडेलची मानसिक तयारी. चित्र कसं दिसणार आहे हे आधी कागदावर पाहिलेलं असलं, तरी ते प्रत्यक्ष रंगवत असतानाचा अनुभव आणि शरीराच्या मितींवर काम केल्यानंतर दिसून येणारा परिणाम हे फारच वेगळे असतात. सतत आठ ते दहा तास कंटाळता शरीराचा इंच न् इंच रंगवून घेणं हे अगदी कस लावणारं आहे. अर्थात या वेळात मॉडेलला कोणताही त्रास होऊ नये, शरीर आखडू नये, शरीराचे तापमान संतुलित राहून घाम येऊ नये अथवा शरीर थंड पडू नये ही सारी काळजी मी आणि माझे मदतनीस घेतच असतो.


आल्प्स पर्वतरांगांच्या सहवासात माझं लहानपण गेलं, तिथला निसर्ग माझ्यासाठी कायमच जवळचा.. त्यामुळेच माझ्या कलाकृतींमध्येही तोच मुख्य प्रेरणा राहिलेला आहे. त्यातूनच वेगवेगळे ऋतू, पंचमहाभूतं, खडक, वृक्ष अशा मध्यवर्ती कल्पना धरून मी अनेक शरीरचित्रं रंगवली. माझ्या डोक्यातल्या कल्पना प्रत्यक्षात आणता आणता केव्हातरी मला International Body-painting Community आणि World Championship चीही माहिती झाली. अधिकृत व्यासपीठावर आपली कला सादर करण्यासाठी, आणि इतर कलाकारांचं काम पाहता येण्यासाठी हे एक चांगलं व्यासपीठ होतं. २००९ मध्ये पहिल्यांदाच या स्पर्धेत मी भाग घेतला. माझा गट होता ब्रशेस आणि स्पंज. आश्चर्य म्हणजे पहिल्याच प्रयत्नात मी पाचवं स्थान मिळवलं. आणि तिथपासूनच एक नवंच आकाश माझ्या रंगांच्या फटकार्यांसाठी मोकळं झालं.
एव्हाना माझ्या या चित्रांची दखल जाहिराती, ध्वनिचित्रफिती, कॅटलॉग्जची मुखपृष्ठे, सीडीजची आवरणे, फॅशनशोज, कार्यशाळा अशा हरेक ठिकाणी घेतली जाऊ लागली होती. खरंतर यातून माझी आर्थिक कमाई व्हावी हा विचार मी कधीच केला नव्हता. माझ्यासाठी ते महत्त्वाचं नव्हतंच. वेगवेगळ्या स्पर्धांची तयारी आणि ही वेगवेगळी कामं करत असताना मी अनेक प्रकारचे अनुभव घेण्यात मग्न होतो. या प्रकारच्या अभिव्यक्तीला स्थळाचे बंधन नाही. साहजिकच माझं पुष्कळसं काम मी माझ्या स्टुडिओबाहेरच, कधी शेतात, कधी जंगलात, कधी टेकाडांवर तर कधी याहूनही भलत्याच ठिकाणी जाऊन केलेलं आहे. अशातच माझ्या कष्टांचं चीज करणारी एक घटना घडली - मला २०१२ साली बॉडीपेंटिंगच्या स्पर्धेमध्ये विश्वविजेतेपद मिळालं! हे या क्षेत्रातलं एक अत्यंत मानाचं शिखर आहे.. केवळ एक छंद म्हणून मनापासून जोपासलेल्या माझ्या कलेने मला मात्र प्रतिष्ठा आणि एक व्यावसायिक ओळखही मिळवून दिली होती! माझ्या आयुष्यातल्या अत्युच्च आनंदाच्या क्षणांपैकी हा एक क्षण होता. आज मागे वळून बघतो तेव्हा मला प्रकर्षाने एकच गोष्ट जाणवते ती म्हणजे कोणत्याही उत्तम कामाचे, त्यातल्या यशाचे एकमेव रहस्य असते... ते म्हणजे त्या कामावर मनापासून केलेले प्रेम. ते जेव्हा साधेल तेव्हा प्रसिद्धी आणि पैसाही आपोआप तुम्हाला शोधत येतोच.
या सूत्रानुसारच मी माझ्या क्षेत्रात नवनवे प्रयोग करत असतो. त्यातूनच मला छद्मवेषी किंवा दृष्टिभ्रम निर्माण करणार्या शारीर रंगलेपनाचा पुढचा टप्पा सापडला. "शरीराच्या घडणींचा आणि शरीर वेगवेगळ्या तर्हेने दुमडल्यामुळे दिसणार्या आकारांचा अचूक वापर करता येणं" हे छद्मवेषी रंगलेपनातलं सर्वात महत्त्वाचं कसब असावं. ते आत्मसात करण्यासाठी मी माणसाच्या अवयवांचं निसर्गामधल्या गोष्टींशी दिसून येणारं साधर्म्य यांचं निरीक्षण करू लागलो. इथेही पुन्हा एकदा निसर्गात आढळणारी चित्रकला आणि शिल्पकलादेखील माझी मार्गदर्शक ठरली. हा खाली दिलेला पोपटाचा फोटो तुम्ही यापूर्वी पाहिलेला असेलच.

ही कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी मी नेमकं किती काळ काम केलं असेल असं तुम्हाला वाटतं? ...या एका चित्रासाठी मला जवळजवळ चार आठवडे लागले! त्यातला सर्वात जास्त काळ हे चित्र कागदावर रंगवण्यात गेला. कोणत्या छटा वापराव्या, मॉडेलची बैठक कशी असावी, छायाचित्र कोणत्या कोनातून काढावं यातले एकूणएक तपशील मी या काळात नक्की केले होते. मॉडेलचं शरीर प्रत्यक्ष रंगवण्यासाठी मला आठ तास लागले होते. त्यानंतर तिला अचूकपणे योग्य त्या बैठकीत बसवण्यासाठी संपूर्ण एक तास खर्ची पडला.. तेव्हा कुठे मी या कलाकृतीचे फोटो घेऊ शकलो. म्हणून मी म्हटलं की माझ्या क्षेत्रात मॉडेलची मानसिक तयारी हा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. कल्पना करा... पूर्ण शरीराला रंग लावून घेतलेल्या स्थितीत कंटाळता, नेटाने तासांमागून तास चित्रकाराने सांगितल्याप्रमाणे उभं अथवा बसून राहायचं, चित्रीकरण सुरू असताना पायाचं किंवा हाताचं बोटही हलवायचं नाही... हे सगळं अजिबातच सोपं नाहीय.
१४ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या माझ्या या प्रवासात आता मला सापडली आहेत समुहशारीरचित्रं. यात एकाहून अधिक व्यक्तींचे शरीर रंगवून त्यांच्या सुयोग्य मांडणीमधून मी एक आकृतिबंध साधत असतो. एका व्यक्तीसाठी चार आठवड्यांची पूर्वतयारी आणि आठदहा तासांचे प्रत्यक्ष रंगकाम... तर त्याहून अधिक व्यक्तींसाठी किती वेळ? हा हिशोब मी तुमच्यावरच सोपवतो. :) या खाली दिलेल्या छायाचित्रात किती व्यक्ती उपस्थित आहेत.. सांगू शकाल?

माझ्या या कलेने मला खूप समृद्ध केलंय, अजूनही करतेय. माझ्या मॉडेल्स, माझे मदतनीस, या कलाकृतींची छायाचित्रं काढणारी मंडळी या सगळ्यांसोबत अजूनही मी नवनवं काहीतरी शिकतोच आहे. या नव्या संकल्पनेतल्या सगळ्या शक्यता अजमावून झाल्या की पुन्हा नवे काहीतरी घेऊन तुमच्या भेटीला येईनच. तोवर.. Ciao!

 
तळटीप: हा अनुवाद नसून जोहॅनसचं मनोगत वाटावं अशा तऱ्हेने केलेलं स्वतंत्र लेखन आहे. हे लिहिण्यासाठी Johannes Stoetter या कलाकाराची जालावर उपलब्ध असलेली माहिती, छायाचित्रं आणि ध्वनिचित्रफिती या सगळ्यांचा उपयोग झाला. काही ठिकाणी एकाच गोष्टीबाबत वेगवेगळे तपशील सापडले, तिथे त्यातल्यात्यात अचूक माहिती वापरण्याचा प्रयत्न केला आहे.)