खरंय! बेचैन नक्कीच आहे मी. अगदी फारच. आधीही तसंच होतं आणि आत्ताही आहे. पण मला वेड लागलं आहे असं काय म्हणून म्हणाल तुम्ही? या आजाराने माझ्या जाणीवा अतिशय तीक्ष्ण केल्या आहेत, तुम्हाला वाटतंय तशा नष्ट केलेल्या नाहीत. त्यात सगळ्यात तीव्र आहे ती म्हणजे माझी ऐकण्याची क्षमता. अस्पष्टशा आवाजालाही वेधणारी. अत्यंत अचूक. अगदी स्वर्गातला असो, की पृथ्वीवरचा किंवा मग पाताळातलाही, कोणत्याही आवाज ऐकू शकेन मी. आता सांगा.. मी काय भ्रमिष्ट आहे? मी जे सांगत आहे ते नीट लक्ष देऊन ऐका. म्हणजे मी किती शांतपणे तुम्हाला ही पूर्ण घटना सांगणार आहे ते समजेल तुम्हाला.
पहिल्यांदा ती कल्पना माझ्या डोक्यात कशी आली हे नेमकं सांगता यायचं नाही. पण एकदा ती मला पटल्यानंतर मात्र तिने माझा दिवसरात्र पिच्छा पुरवला. माझा हेतू काही नव्हता. मला कसलाही ध्यास नव्हता. मला आवडायचा तसा तो म्हातारा. ना तो माझ्याशी कधी वाईट वागला. ना अपमानास्पद वाटेलंसं वागला. ना मला त्याच्या संपत्तीची अभिलाषा वाटली. पण.. पण त्याचा तो डोळा!! मला वाटतं.. तेच कारण होतं. त्याचा तो डोळा ना अगदी गिधाडासारखा होता - फिकुटलेला, मळकट निळसर रंगाचा, पातळसा पडदा असलेला. ज्या ज्या वेळी ती मळकट निळी नजर माझ्यावर पडे, त्या त्या वेळी माझे शरीर ताठून जाई, रक्त गोठून जाई. हळूहळू, क्रमाक्रमाने माझा निश्चय बळावत गेला. त्या निळ्या डोळ्यापासून सुटका हवी तर त्या म्हाताऱ्याचा जीव घेण्याशिवाय काही पर्यायच नव्हता, माझी खात्रीच झाली तशी.
आता हे बघा, मला वेड लागलं आहे, असं तुम्हाला वाटतंय. पण वेड्या माणसांना माहीत असतं का काही? नाही ना? तुम्ही मला पाहायला हवं होतंत. तुम्ही पाहायला हवं होतं, किती सावधपणे मी पावलं टाकली - किती दूरदर्शीपणे - केवढ्या बेमालूमपणे - मी माझी मोहिम सुरू केली! त्या म्हाताऱ्याचा जीव घेण्याअगोदर पूर्ण आठवडा त्याच्याशी माझं वागणं किंचितही बदललं नाही, त्यात कोणताही अवाजवी दयाळूपणा आला नाही. आणि रात्री? अंधार पडला की मध्यरात्रीच्या सुमारास मी त्याच्या दाराचं लॅच फिरवून ते दार उघडत असे.. अगदी अलगऽऽद! आणि मग, ते दार माझं डोकं आत शिरेल इतकं किलकिलं झालं, की त्या खोलीतल्या अंधारात माझ्या हातातला दिवा प्रवेश करत असे - पूर्णपणे झाकलेला! प्रकाशाची इतकीही तिरिप दिसणार नाही असा झाकलेला. आणि मगच मी माझं डोकं आत घालत असे. माझी ही चलाखी बघून तुम्हाला नक्कीच हसू फुटल्याशिवाय राहिलं नसतं! मी माझं डोकं धीमे धीमे .. अगदी धीमे धीमे आत शिरू देत असे. आता मला त्याची झोपमोड थोडीच करायची होती?? तब्बल एक तास लागायचा मला फक्त माझं डोकं आत घालायला, मग कुठे माझं लक्ष्य, तो म्हातारा मला पलंगावर झोपलेला दिसू लागे. आता सांगा.. एखादी वेडी व्यक्ती अशा हुशारीने वागू शकते का?
तर.. एकदा का माझं डोकं पूर्ण आत शिरलं, की माझा दिवा मी सावकाऽऽश मालवत असे.. त्याचा आवाज होऊ नये इतका सावकाश, आणि त्यातून केवळ एकच प्रकाशकिरण बाहेर येऊन त्या गिधाडासारख्या डोळ्यावर पडेल इतकाच..!
सतत सात रात्री मी हे केलं. नेमक्या मध्यरात्रीच्या वेळी. मला त्या म्हाताऱ्याचा काही त्रास नव्हता, हे सांगितलंय मी तुम्हाला. पण तो निळा डोळा! खिजवत असे तो डोळा मला!! पण दरवेळी तो डोळा मिटलेलाच दिसे. त्यामुळे मग.. त्या निळ्या डोळ्यापासून सुटका हवी तर त्या म्हाताऱ्याचा जीव घेण्याशिवाय काही पर्यायच नव्हता! हो की नाही?
दररोज सकाळी मात्र मी सहजपणे त्याला भेटत असे, अगदी त्याच्या नावाने हाक मारून त्याची विचारपूस करत असे. रात्री शांत झोप लागली ना.. हेही विचारत असे! अगदी साधा सरळ म्हातारा होता हो तो.. तो झोपलेला असताना दर मध्यरात्री त्याच्या खोलीत शिरून कोणी त्याला निरखतं आहे, अशी शंकाही येणं शक्य नव्हतं त्याला.
आठवी रात्र. मी रोजच्यापेक्षा अधिकच सावध असल्याचं चांगलं आठवतंय मला. घड्याळाचा मिनिटकाटादेखील माझ्या मनापेक्षा जलद धावत होता, हे अगदी खात्रीपूर्वक सांगू शकेन मी. माझ्या ताकदींची, माझ्या बुद्धिमत्तेची इतकी जाणीव मला पहिल्यांदाच होत होती. मी माझ्या ध्येयाच्या जवळ पोचत असल्याचा आनंद माझ्या मनात मावत नव्हता. मी इथे दार उघडून त्या खोलीत प्रवेशत असताना त्याला मात्र माझ्या अंतस्थ हेतूंची, आणि कृतींचीसुद्धा स्वप्नातही कल्पना नव्हती! माझ्या मनाला या विचाराने गुदगुल्या होत होत्या, मला आलेलं हसू मी दाबलं खरं.. पण तरी बहुधा त्याने ते ऐकलं असावं!! झोपेत दचकावं तसा तो पलंगावरच हलला!! आता मी मागे फिरण्याचा विचार केला असेल असं वाटतंय ना तुम्हाला? छे, मुळीच नाही. खोलीत डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही, इतका अंधार होता (खिडक्या घट्ट बंद करून घ्यायची त्याची सवय माहीत होती मला), आणि त्या पलंगावरून खोलीचा दरवाजा मुळीच दिसत नसे. त्यामुळे मी आत शिरायचं काम सुरूच ठेवलं. डोकं आत घातल्यावर रोजच्याप्रमाणे दिवा मालवण्यासाठी मी हालचाल केली.. आणि माझं बोट सटकलं!! अस्पष्टसा आवाज झाला!!
म्हातारा ताडकन् उठून बसला! 'कोण आहे??' त्याचा भ्यायलेला आवाज खोलीत घुमला!
मी स्तब्ध राहून तोंडातून अवाक्षरही काढलं नाही. पूर्ण एक तास! निश्चल! गप्प! पण त्या एक तासात तो अजिबात आडवा झाला नाही. खोलीत काय आहे याची चाहूल घेत राहिला. जशी मी त्याच खोलीत गेले सात रात्री घेतली होती - त्याच्या मृत्यूची.
अचानक त्याच्या तोंडून भयाचा सुस्कारा ऐकू आला. मरणाच्या भीतीने. शंकाच नको. अगदी व्यवस्थित समजलं मला ते. या उद्गाराशी चांगलाच परिचय होता ना माझा.. सगळं जग झोपलेलं असताना, मध्यरात्रीच्या संपूर्ण एकटेपणात माझ्याच खोलीत कितीदा माझ्याच तोंडून आलेला ऐकलाय तो मी! दया आली मला त्याची, आणि हसूही फुटलं मनातल्या मनात. मला चांगलंच ठाऊक होतं, तो पहिल्यांदा पलंगावर वळला, त्या क्षणापासून त्याची झोप उडालेली होती. त्याची भीती नकळत त्याचा पुरता कब्जा घेत होती. ती भीती निरर्थक ठरवायचा तो आटोकाट प्रयत्न करत असणार, पण ते जमत नव्हतं त्याला. तो स्वतःशी बोलत असणार.. 'एखादा उंदीर.. नाहीतर किडा.. बाकी काही नाही..'. त्या आवाजाचं पटेलसं स्पष्टीकरण शोधत होता ना तो.. पण नाईलाज होत होता त्याचा. कारण खरोखरच मृत्यू त्याच्या खोलीत उभा राहून त्याच्याकडे गालातल्या गालात हसून पाहत होता. त्या काळोख्या अंताची चाहूल नाकारणं शक्य तरी होतं का त्याला? डोळे टक्क उघडे ठेवून तो पलंगावर बसला होता...
..डोळे टक्क उघडे ठेवून तो पलंगावर बसला होता! तो निळा डोळा! सताड उघडा! गेले सात रात्री मी ज्याची वाट पाहिली तेच होतं हे.. तेच!!
मी दिव्यावरचं आवरण अगदी स्थिर हाताने किंऽऽचित हटवलं. प्रकाशाची एक तिरीप थेट त्या गेले सात दिवस माझं लक्ष्य बनलेल्या, मला बेचैन करणाऱ्या, गिधाडासारख्या, निळ्या डोळ्यावर पडली!
आता तुमच्यासमोर मान्य करायला हरकत नाही.. जेव्हा तो अभद्र डोळा माझ्या नजरेला पडला, तेव्हा त्या मरणभीतीचा कणभर स्पर्श मलाही झाला! मणक्यातून एक थंडगार प्रवाह सरकत गेला! त्या खोलीतल्या साचलेल्या काळोखात एकूणएक गोष्ट बुडून गेली होती. तो पलंग, तो म्हातारा, त्याचा चेहरा.. सगळंच. उरला होता तो प्रकाशकिरण आणि तो निळा डोळा..!
मी तुम्हाला आधीही म्हटलं, जेव्हा संवेदना अत्यंत तीक्ष्ण होतात, तेव्हा ते वेडेपणाचं लक्षण ठरवणं हे नेहमीचंच आहे. झालं असं, की मी तो डोळा निरखत असताना अचानकच एक आवाज ऐकू येऊ लागला. दबका, पण तीव्र, अविलंब.. कुठेतरी कापडाच्या गाठोड्यात दडपलेल्या घड्याळाचे ठोके पडत राहावे तसा. मला स्पष्ट ऐकू येत होतं. हा आवाजही मी ओळखला. धडधड.. धडधड... त्या म्हाताऱ्याच्या भीतीचा आवाज होता तो! भीतीने गोठत चाललेल्या त्याच्या हृदयाचा! त्या ठोक्यांच्या आवाजाने मला अधिकच आवेश चढला. जसा ड्रमच्या तालावर एखाद्या सैनिकाला चढतो. अगदी तसाच.
पण तरीही मी किंचितही हालचाल केली नाही. माझ्या हातातला दिवाही तसाच होता. स्थिर. त्या डोळ्यावरून तो प्रकाश किरण हटून कसं चाललं असतं? पण त्याच्या भीतीने त्याचा पूर्णपणे ताबा घेतला होता हे नि:संशय! कारण तो हृदयाच्या धडधडीचा आवाज वाढतच चालला. जलद, अतिजलद. अगदी कोलाहलच होऊ लागलं ते धडधडणं. तुमच्या लक्षात येतंय का? त्या अपरात्री, त्या बंदिस्त खोलीतल्या विकट काळोख्या शांततेत.. मी आणि क्षणाक्षणाला वाढणारा, माझ्या कानांवर आदळणारा तो कोलाहल. धडधड.... धडधड.. धडधड धडधडधडधडधडधड...!!
मला धोका निर्माण झाला होता! त्या भयव्याकूळ हृदयाचा हा आकांत, ही धडधड कोणा शेजाऱ्याने ऐकली असती म्हणजे?? बास!! त्या म्हाताऱ्याचा काळ आला होता!! दातओठ खात, पूर्ण शक्तीनिशी मी उसळी घेतली, माझा दिवा खोलीच्या कोपऱ्यात भिरकावला, त्या म्हाताऱ्याला आडवं पाडलं आणि.. आणि सगळी ताकद एकवटून त्याचा गळा..!!
........!
आह! किती सहज.. किती सहज माझ्या मनाची शांतता मला परत मिळाली होती. निर्जीव होत जाणाऱ्या त्या निळ्या डोळ्याने अखेरच्या क्षणी माझ्याकडे भयचकित अविश्वासाने पाहिलं होतं. त्या म्हाताऱ्यानेही अखेरच्या क्षणी प्राण वाचवण्याची धडपड केलीच असेल कदाचित.. मला वाटतं एक अस्फूट किंकाळीही फुटली त्याच्या तोंडून. पण मी माझ्या लक्ष्यावरून अजिबात विचलीत झाले नाही. मला बेचैन करत राहणाऱ्या त्या डोळ्याला अखेर मी संपवलंच.
त्या हृदयाचे मंद मंद होत जाणारे ठोके अजूनही ऐकू येत होते. पण त्यांची फारशी फिकीर नव्हती मला. आता ते भिंतीपलीकडे नक्कीच ऐकू गेले नसते. काही क्षणांतच ते थांबले. मी त्या म्हाताऱ्याचं नीट निरीक्षण केलं. त्याच्या हृदयावर हात ठेवून चाहूल घेतली.. शांत झालं होतं आता ते. निष्प्राण झाला होता तो म्हातारा. त्या निळ्या डोळ्याने चालवलेला माझा छळ संपवण्याची मोहीम फत्ते झाली होती!
आता सांगा.. इतक्या काळजीपूर्वक आपलं काम पार पाडणारी व्यक्ती भ्रमिष्ट असेल का? त्या निष्प्राण देहाची व्यवस्था लावताना मी किती सावधगिरी बाळगली हे ऐकलंत की मग तर खात्रीच पटेल तुमची, की तसं अजिबात नाही.
रात्र सरत चालली होती, आणि मला घाई करणं भाग होतं. पण कोणालाही चाहूल लागू न देता. माझं लक्ष त्या लाकडी जमिनीवरच्या फळ्यांकडे गेलं...
...माझं काम पूर्ण होईतो पहाटेचे चार वाजले होते. तिथे काही वावगं आहे हे आता कोणालाही समजलं नसतं. त्या खोलीत कुठेही रक्ताचा ठिपका, एखादा डाग किंवा झटापटीचं चिन्हही नव्हतं, मी तशी काळजी घेतलीच होती. त्यामुळे मी निश्चिंत मनाने श्वास घेतला! वरच्या मजल्यावरच्या माझ्या खोलीत जायला आता हरकत नव्हती.
बाहेर अजूनही अंधारच होता. मी घड्याळाचे टोले ऐकत असताना..
नेमकं त्याच वेळी त्या एकमजली घराच्या दारावर ठकठक झाली. मी त्या खोलीतून बाहेर पडून दार उघडलं, अगदी निश्चिंत मनाने! मला भ्यायचं कारणच कुठे उरलं होतं आता.. दाराबाहेर गणवेशातली तीन माणसं होती. पोलिस खात्यातली. त्यांनी अदबीने मला आपला परिचय दिला आणि सांगितलं की कुणा शेजाऱ्याला काही वेळापूर्वी इथून एक किंकाळी फुटल्याचा आवाज आला, त्याबाबत चौकशी करायला ते आले आहेत.
मी हसून त्यांचं स्वागत केलं.. अर्थातच! त्यांना मी सांगितलं, की कोणतंसं भयप्रद स्वप्न पडल्यामुळे ती किंकाळी माझ्याच तोंडून फुटली असावी. त्यांना मी हेही म्हटलं, की इथे या खोलीत काही दिवसांपूर्वीच राहायला आलेल्या म्हाताऱ्या माणसाला मी फारसं ओळखत नाही, पण तो सध्या कुठेसा बाहेर गेला आहे. अरे हो, मी त्यांना त्याच खोलीत नेलं होतं तपासाची सुरूवात करण्यासाठी..
त्यांनी सगळी खोली नीट पाहिली. माझं अर्थातच त्यांना पूर्ण सहकार्य होतं. त्याच्या सर्व वस्तू जागच्या जागी आहेत हे पाहिल्यामुळे, आणि मुख्य म्हणजे ती किंकाळी कोणाची हे कळल्यामुळे त्यांचं समाधान झालेलं दिसलं. अशा अवेळी तपास करण्यासाठी बाहेर पडावं लागत असण्याबद्दल मी सहानुभूती व्यक्त केली आणि त्यांनी काही वेळ इथे या खोलीत बसून विश्रांती घ्यावी असं सुचवलं. बोलता बोलता मी चार खुर्च्याही मांडल्या. अगदी त्याच तीन फळ्यांच्या वर.
आता सांगा.. माझ्या वागण्यामुळे ते अगदी नि:शंक होणं स्वाभाविक नव्हतं का? त्यांच्या सर्व प्रश्नांना मी सुसंगत उत्तरं दिली होती. त्यांचा तपास सहज पूर्ण होऊ शकला होता. हळूहळू त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. पण मला मात्र आता दमल्यासारखं वाटत होतं. आता ते तिघं गेले तर बरं असं माझ्या मनात येऊ लागलं. माझं डोकं दुखू लागलं, कानात ठोके पडताहेतसं वाटू लागलं. त्या ठोक्यांकडे दुर्लक्ष व्हावं म्हणून मी त्यांच्याशी बोलणं सुरूच ठेवलं. पण ते थांबेनात. वाढतच राहिले. अधिकाधिक स्पष्ट होत राहिले. त्यांचा आवाज.. दबका, पण तीव्र, अविलंब.. कुठेतरी कापडाच्या गाठोड्यात दडपलेल्या घड्याळाचे ठोके पडत राहावे तसा. मला घुसमटल्यासारखं होऊ लागलं. एकाएकी माझ्या लक्षात आलं! ते ठो़के माझ्या कानात पडतच नव्हते...! ....?
... निळ्या डोळ्याचा तो म्हातारा!
माझी अस्वस्थता पराकोटीची वाढली. मला धोका निर्माण झाला होता! त्या हृदयाची ही धडधड पोलिसांनी ऐकली असती म्हणजे..? निघून का जात नाहीत ते? मी माझं बोलणं सुरूच ठेवलं - अधिक मोठ्या आवाजात. पण ते ठोके त्यावरही मात करून माझ्या कानांवर आदळत राहिले.
ठोके.. माझी बडबड.. ते ठोके.. आणि माझी बडबड..! त्या पोलिसांना मात्र काहीही ऐकू येत नव्हतं.. ते गप्पा मारत होते. ते हसत होते. ते माझी अस्वस्थता, ती धडधड कशाकडेही लक्ष देत नव्हते. मी त्या खोलीत येरझाऱ्या घालायला सुरूवात केली. त्या पोलिसांचं त्या धडधडीकडे का लक्ष जात नव्हतं हे मला कळत नव्हतं! त्यांना खरंच ऐकू येत नव्हतं? का ते फक्त तसं दाखवत होते? काय करावं मला कळेना. एकीकडे माझ्या कानात ऐकू येणारे ते ठोके आणि त्याचवेळी त्या पोलिसांची सुरू असलेली बातचीत. हास्यविनोद. ही काय तर्हा झाली?
एकाएकी माझ्या लक्षात आलं! त्यांना संशय आला होता! नक्कीच त्यांना कळलं होतं! ते माझ्यावरच हसत होते! होय. खात्रीच झाली माझी. मला वेड्यात काढणाऱ्या त्या हसण्याहून मला दुसरं काहीही चाललं असतं. माझ्या या उपहासापेक्षा दुसरं काहीही सहन झालं असतं. ते ढोंगी हसणं मला अधिक सहन होईना! जोरात किंचाळावं अन्यथा माझा जीवच जाईल असं मला वाटत होतं.
आणि अखेर मी किंचाळलेच!
'बास!! पुरे झालं ढोंग! त्या फळ्या काढा.. त्याच. त्या तीन. नीट बघा तिथे. मीच त्या म्हाताऱ्याचा गळा दाबला. त्याच्या देहाचे लहानलहान तुकडे केले. ते पहा त्या फळ्यांखाली आहेत ते.. आणि तिथेच आहे तेही अजून. त्या म्हाताऱ्याचं ते धडधडत असलेलं अभद्र हृदय! भ्रमिष्ट म्हणे..!!'
(मूळ कथा - एडगर एलन पो)