Monday, December 30, 2013

संवादाबाबत बोलायचंय..

प्रिय,
मागे एकदा वाचलं होतं एका ठिकाणी. पुस्तक लिहिलं पण ते कोणी वाचलंच नाही तर लेखकाला चालेल का?
आपल्याला - माणसाला काहीतरी सांगायचं असतं. ऎकणारं कोणीतरी हवं असतं.
लेखकाला लाखो वाचकातले पाचदहा भेटत असतील. पण लाखोंनी माझं म्हणणं ऎकलं हे समाधान त्याहून मोठं असतं.

संवाद! मी संवादाबाबत बोलतेय..
जगात माणूस लख्ख एकटा पडला तरी लिहून ठेवतो. चित्रं कोरतो. बाटलीत चिठ्ठी टाकून पाण्यात सोडतो. डेटाची डिस्क तयार करून अंतराळात सोडून देतो. बेटावर अडकलेला चक नॉलन्ड चेंडूला नाक डोळे देतो.
आम्ही आहोत/होतो हे नोंदवायची ओढ.. का असते ती?
व्यक्त होते.. ती व्यक्ती!
म्हणजे माझं असणं हीच व्यक्त होण्याची व्याख्या आहे.
मग ती व्याख्या पूर्ण व्हावी म्हणून तशा श्रोत्याची योजना का केली जात नाही?
तर ते तसं श्रोतृत्व मात्र विखुरलेलं.
याच्यात.. त्याच्यात..
मी जी व्यक्ती आहे ती पूर्णपणे कोणा एकाला का कळत नाही?

जिगसॉ!
आयुष्य म्हणजे जिगसॉ...
एक तुकडा याचा.. एक त्याचा..
चित्राचा एक भाग याला दिसला, दुसरा त्याला, काही भाग अजून मिसिंगच. आणि एकाची दुसर्याला दखल पण नाही.
मी... मला माहीत असलेली. तिला. हिला. यांना. त्यांना.
मी कोण यातली?
सगळ्यांनाच इतके प्रश्न पडतात का? नसतील तर मला का?
प्रयोजन?
पूर्णत्व. एकसंधत्व??
असं विभागलेलं राहण्याचा ताण पडतो.
आणि एकसंध झाले तर ते तरी सुखमय असणार का?
की तगमग राहणारच?
..

Peace!
शांतता. पूर्ण शांतता.
सोबतीमध्ये आहे का ती खरंच..?
नाती आकार बदलतात.. सुरुवात एक.. मध्य वेगळा.. शेवट अननोन्..
नातीच घेरून असतात ना?
केवढंतरी आयुष्य व्यापून असतात.
मग त्यांनीच ही सोबतीची गरज पूर्ण करायला नको?
माणूस समजून घ्यायसाठी काय लागतं?
सहवास? समज?
इच्छा?
ट्युनिंग?
सहवास नक्की नसावा.. नाहीतर भावंडं तुटली नसती.

एक उत्तर मी सतत शोधते... अस्वस्थ वाटू लागतं तेव्हा हमखास शांत करणारी जागा कोणती?
ती जागा एखादी व्यक्ती नक्कीच नसणार - माणसं बदलतात. आपण हताश होण्याइतकी बदलतात.
गाणं ऎकतानाचा आनंद.. एवढा एकच शंभर टक्के वेळा मला माझा वाटलाय.
याखेरीज कोणतीच गोष्ट तोच आनंद न चुकता देत नाही.

हे जे काही मला वाटतंय ते किती काळ असं?
माझा स्टॉप कोणता? कोणता?
… क्रमश:?

No comments: