प्रेम
म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम
असतं
शिडीवर
चढता चढता सापानं
गिळायचा गेम असतं.याच नावाने प्रदर्शित झालेला मृणाल कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केलेला पहिला सिनेमा या विकांताला अखेर पाहिला. गेल्या काही काळात आलेला वैवाहिक नातेसंबंधावर उत्तम भाष्य करणारा हा दुसरा मराठी सिनेमा.
ही गोष्ट अनुश्री, केदार, डॉक्टर रोहित आणि प्राची या चौघांची गोष्ट आहे. अनुश्रीसोबत काही वर्षांचा संसार झाल्यानंतर दोन मुली आणि आई यांच्याकडे पाठ फिरवून केदार वेगळ्या मुलीच्या प्रेमात पडून चार वर्षांपूर्वी घर सोडून निघून गेला आहे. अनुश्री तिचं दुखावलेपण, एकटेपण मनाच्या कोपर्यात टाकून ठामपणे मुलींना, सासूबाईंना, आईवडिलांना, आणि महत्त्वाचं म्हणजे स्वतःला सांभाळते आहे. फुलांचा व्यवसाय करते आहे. तर संशोधनात करियर करायची असल्याने रोहितवर मुलांची जबाबदारी टाकून प्राचीने वैयक्तिक प्रगतीची वाट निवडली आहे. हे दोघं प्राचीच्या आग्रहाखातर कायदेशीररीत्या विभक्त झाले आहेत, मात्र आजही मैत्रीचं नातं टिकवून आहेत.
यांच्या आधीची पिढी आहे अनुश्रीच्या आईवडिलांची, सासूबाईंची. तिच्या सासूबाई सुनेशी प्रतारणा करणार्या मुलाला आयुष्याबाहेर काढण्याइतक्या तत्त्वनिष्ठ आहेत. तर आई आणि वडील हे अनुक्रमे 'केलंय ते निभवायला हवं' आणि 'आता या वयात मुलीचं दु:ख पाहायला लागू नये, तिला आधार देण्याची आता ताकद नाही, म्हणूनतरी तिने तडजोड करावी' अशा विचारांचे आहेत.
अनुश्रीची बहिण मात्र मोठ्या बहिणीच्या विस्कटलेल्या संसारामुळे लग्नाच्या बाबतीत काहीशी बॅकफूटवर गेलेली, सहजीवनाचा अर्थ शोधतेय. ज्याच्यासोबत तडजोड आणि व्यक्तीस्वातंत्र्य या दोहोंमध्ये संतुलन साधता येईल असा जोडीदार शोधतेय.
रोहित आणि अनुश्रीची भेट ही फिल्मी न वाटणार्या योगायोगाने होते. रोहितच्या हॉस्पिटलच्या आवारात बाग फुलवण्याच्या निमित्ताने दोघं भेटत राहतात. आधी मैत्री आणि मग त्याहून पुढे आकर्षण यातून दोघं एकमेकांना जाणून घेत राहतात. आपल्या एकत्र असण्यामध्ये नुसत्या मैत्रीच्या पलीकडच्या शक्यता आहेत असं दोघांनाही लक्षात येतं.
दोघंही आपल्या मनाशी आणि परिस्थितीशीही प्रामाणिक राहून एकमेकांशी याबद्दल बोलू पाहात असतानाच केदार अनुश्रीच्या आयुष्यात परत येतो. रोहित आणि अनुश्रीकडून नीटसपणे कळायला हवं ते अगदी धक्कादायक अपघातानेच तिच्या मुली, नवरा आणि सासूबाईंना कळतं. इतकी वर्षं सुनेच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहणार्या सासूबाई यावेळी मात्र तिच्याशी बोलणं सोडतात. वाढत्या वयाची मोठी मुलगी तर आईवर थेट आरोप करते. अशा आक्रमक परिस्थितीत हे दोघं नेमकं काय करतात, स्वतःच्या भावनांना न्याय देतात की कुटुंबापुढे वैयक्तिक सुखाचा विचार बाजूला ठेवतात, याची उत्तरं म्हणजे हा सिनेमा.
अनेकविध भूमिकांद्वारे दीर्घ कारकीर्द गाजवून एखादी व्यक्ती जेव्हा दिग्दर्शनाकडे वळते, तेव्हा त्यातून तिने शिकलेल्या, खरंतर टिपलेल्या गोष्टी दिसून याव्या ही अपेक्षा सहजच निर्माण होते. आणि या सिनेमातून मृणाल कुलकर्णी यांनी ती अपेक्षा शंभर टक्के पूर्ण केलीय. लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय या तीनही आघाड्या त्यांनी सांभाळल्यात.
या सिनेमाचं एक वैशिष्ट्य म्हणजे, केदार वगळता यातल्या सगळ्या व्यक्तीरेखांनी आयुष्यातल्या कसोटीच्या प्रसंगी त्या त्या वेळच्या परिस्थितीनुसार जे सर्वात योग्य वाटले ते निर्णय घेतले आहेत. घरापेक्षा संशोधनातलं करियर मोठं वाटू लागल्यावर सगळ्या शक्यता आजमावून अखेर प्राचीने वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय. तिच्या व्यक्तीस्वातंत्र्याचा कायमच आदर करणार्या रोहितने सर्व प्रयत्न करून झाल्यावर घटस्फोटाच्या निर्णयाचा स्वीकार केलाय. तर अनुश्रीच्या सासूबाईंनी सुनेची फसवणूक ती कुटुंबाची फसवणूक असं मानून स्वतःच्या मुलाला घरापासून वेगळं काढलंय. अनुश्रीला तर निर्णयाचं स्वातंत्र्य मिळालेलंच नाही. तिचं भावविश्व केदार निघून गेला त्या क्षणापाशीच थांबलेलं आहे. किंबहुना अनुश्री ही व्यक्तीरेखा वाट्याला आलं ते गप्पपणे स्वीकारणारी अशीच आहे.
केदार ही व्यक्ती मात्र या सगळ्यांपेक्षा वेगळी, म्हटली तर इम्पल्सिव्ह आणि म्हटली तर बेजबाबदारही आहे. संसाराच्या कोणत्याशा टप्प्यावर वेगळीच स्त्री आवडली म्हणून स्वतःची वाट बदलणारा हा पुरुष आहे. तितकाच तो मुलींच्या प्रेमाने हळवा होणारा बाप आहे, आईच्या दुराव्याने कासावीस होणारा मुलगा आहे. मात्र त्याच्या वागण्याचा बेस हा पूर्णतः 'तो स्वतः' हाच आहे. त्याच्या परत येण्यालाही कोणतंही ठोस कारण नसून केवळ ते त्याच्या सोयीचं आहे, म्हणून तो परत येतो आहे.
सगळ्या व्यक्तीरेखांना माणूस म्हणून वागायची दिलेली मूभा ही या सिनेमाची आणखी एक विशेष बाब. उदाहरणार्थ, केदार चुकला असताना स्त्री म्हणून त्याला शिक्षा करणारी त्याची आई, तो परत आल्यावर आई म्हणून विरघळते, सुनेनेही त्याला माफ करावं ही अपेक्षा करते. स्वतःच्या मुलीला तडजोड कर असं सांगताना अनुश्रीचे वडील 'हाच सल्ला मी मित्राच्या मुलीलाही दिला असता का? कदाचित तिथे जबाबदारी नसल्याने वेगळं वागलो असतो' असं स्वतःशी परखडपणे कबूल करतात. अनुश्री स्वतः केदारच्या परत येण्याची मूकपणे वाट पाहते आहे, पण तो अशा वेळी परत येतो, जेव्हा तिला स्वतःचं स्वतंत्र अस्तित्त्व आणि सहजीवनातला आनंद या दोन्ही गोष्टी लाभत आहेत. संसार आणि स्वानंद यातून काय निवडावं याबाबत ती गोंधळून गेलीय.
सगळ्याच कलाकारांनी आपापल्या भूमिका समरसून केल्या आहेत. भावना व्यक्त करण्याच्या बाबतीत दबलीशी राहणारी, सगळ्या आघाड्यांवर तोंड देणारी अनुश्री मृणाल कुलकर्णी यांनी उत्तम साकारली आहे. परिस्थितीचा स्वीकार हाच जिचा स्वभाव आहे, अशी स्त्री 'आता मात्र निर्णय घ्यायला हवाच' या टोकाला येऊन पोचत असतानाचे तिच्यातले बदल लहानलहान प्रसंगातून दाखवले आहेत.
प्राची
झालेली पल्लवी जोशी आणि
केदारच्या भूमिकेतील सुनिल बर्वे
यांना कथेमध्ये पूरक
भूमिका आहेत, आणि दोघांनीही
आपापल्या व्यक्तिरेखा समजून उभ्या
केल्या आहेत. सतत संशोधकाच्या
शिस्तीने वागणारी स्त्री आणि
मुलांपासून, सदैव पाठिंबाच
देणार्या जोडीदारापासून
दूर गेलेली स्त्री
ही प्राचीची दोन
रूपं असोत, किंवा
आयुष्यात काय हवं
आहे याबद्दल कोणताच
नेमकेपणा नसलेल्या केदारचा स्वभाव
असो, ही एखाद्याच
प्रसंगातून ठळक झालीयेत.
मात्र
सर्वात महत्त्वाची व्यक्ती आहे
ती म्हणजे सचीन
खेडेकरांचा डॉ रोहित
फडणीस. जणू खेडेकरांना
डोळ्यापुढे ठेवूनच हे रेखाटन
केलं गेलं असावं,
इतकं हे पात्र
उत्तम साकारलं आहे.
आपल्या बायकोला हवी ती
स्पेस मिळवून देणारा,
त्यासाठी नीट विचारांती
पाठिंबा देणारा, कृती करणारा
असा हा नवरा
आहे. ती स्पेस
मिळवण्याच्या नादात घराचं घरपण
मोडून निघून गेलेल्या
बायकोसाठी तो जितका
अढळ आहे, तितकाच
अनुश्रीबरोबरच्या नात्यातही दृढपणे, संयमाने
उभा राहिला आहे.
आपल्या आयुष्यात आता दुसरी
व्यक्ती आलीय, हे प्राचीला
सांगत असताना सचीन
खेडेकरांनी आणि पल्लवी
जोशी यांनीही तो
पूर्ण प्रसंगच तोलून
धरला आहे! या
प्रसंगातून त्यांच्यातलं नवराबायकोचं नातं संपलं
तरी परस्परांबद्दलचा आदर
संपला नाहीय, हे
उमगून जातं.
कुटुंबासाठी
करायची असलेली तडजोड आणि
स्वतःला पूर्ण वाव देण्याची
धडपड, या दोन
परस्पर विरोधी घटना सर्वात
जास्त परिणाम करत
असतील तर तो
नवरा बायको या
नात्यावर. अशावेळी एकाने आपली
वाट निवडल्यानंतर दुसर्याने तसेच
ताटकळत राहावे, की आनंदी
होण्याचा अधिकार स्वतःलाही बहाल
करावा, या प्रश्नाचं
उत्तर शोधण्याची वेळ
येते, तेव्हा सगळे
मुखवटे बाजूला ठेवावे लागतात.
आदर्श वागण्याचे, त्यागाचे,
पडतं घेण्याचे.. सगळेच.
एका मोडकळीला आलेल्या
लग्नाला दुसरं लग्न हाच
पर्याय असावा का? सुदृढ
अशी मैत्रीदेखील हवी
ती ऊर्जा पुरवायला
पुरेशी ठरू शकते?
विवाहित व्यक्तीच्या आयुष्यात अशा
मैत्रीचं काय स्थान
असू शकतं? किंबहुना
अशी भिन्नलिंगी व्यक्ती,
जी आयुष्याला संपूर्ण
करते, तिच्यासोबतच्या नात्याला
नाव द्यायला हवंच
का? असे अनेक
प्रश्न सोडवावे लागतात.
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं ही त्या प्रश्नांची घेतलेली दखल आहे.
(१४ मे २०१३)
1 comment:
interesting वाटतोय. छान पोस्ट.
Post a Comment