Friday, December 13, 2013

सर्व मासेषु च उत्तम - कार्तिकाचे कौतुक

|| वनस्पतीनाम् तुलसी, मासानाम् कार्तिकः प्रियः ||
|| एकादशी तिथी नाम च क्षेत्रम् द्वारका मम ||
स्कंद पुराणातल्या या श्लोकात श्रीकृष्णाच्या प्रिय गोष्टींमध्ये ज्याचं नाव येतं तो सर्व महिन्यात श्रेष्ठ असलेला महिना म्हणजे कार्तिक महिना. या महिन्यात श्रीविष्णू, श्रीराम, श्रीकृष्ण, विठ्ठल, शिवशंभू या देवांच्या विविध प्रकारे उपासना करतात. दिवाळी, तुळशीचं लग्न, दीपोत्सव, वैकुण्ठ चतुर्दशी (शैव-वैष्णवांनी परस्परांच्या दैवतांना प्रणिपात करण्याचा दिवस), त्रिपुरारी पौर्णिमा हे दिवस कार्तिकात साजरे होतात. कार्तिक स्नानाचेही अपार महत्त्व आहे. बलिप्रतिपदेने सुरू होणाऱ्या या महिन्यातल्या जवळ जवळ प्रत्येक दिवसाला कोणते न कोणते धार्मिक महत्त्व लाभलेले आहे. अशा या महिन्यात घेतलेले कोणतेही साधेसे व्रतही दुर्लभ असे फळ देऊन जाते. साधक आणि उपासकांसाठी तर हा महिना उपासनेचे विशेष फळ देणारा आहे.
कार्तिक कौतुकाच्या बहुतेक कथा श्रीविष्णू आणि श्रीकृष्ण यांच्याशी जोडलेल्या आहेत. आषाढ शुद्ध एकादशीला क्षीरसागरात झोपी गेलेले श्रीविष्णू कार्तिक शुद्ध एकादशीला जागे होतात आणि चातुर्मास संपतो. म्हणून हा कार्तिक महिना विशेष महत्त्वाचा. सत्यभामेने श्रीकृष्णाला कार्तिकाची महती विचारली असता, कृष्णाने तिला मत्स्यावताराची कथा सांगितली. त्यानुसार, शंखासुराने वेदांचे हरण करून ते सप्तसागरात दडवून ठेवले. वेदांची सुटका करण्यासाठी आणि शंखासुराचा विनाश करण्यासाठी श्रीविष्णूंनी मत्स्यावतार धारण केला तो कार्तिकी एकादशीच्या दिवशी.
मात्र, सर्वात लडिवाळ आणि तितकीच अर्थगर्भ अशी कथा आहे ती बाळकृष्णाची.. कृष्ण आणि बलरामाच्या खोड्यांनी सारे गोकूळ त्रस्त झाले असूनही यशोदेने या दोघांना कधीच शिक्षा केलेली नाही. एकदा मात्र लोणी चोरल्याबद्दल तिने त्याला उखळाला बांधून ठेवले होते. लहान दोरखंड पुरेना तेव्हा मोठा दोरखंड घेऊन तिने आपले प्रयत्न सुरूच ठेवले. अखेरीस कृष्ण बांधला गेला. किती विलक्षण आहे पाहा, साक्षात परमात्मास्वरूप असे ज्याचे वर्णन तो जन्मतःच केले गेले, पहिली पावले टाकण्याआधीच ज्याने विक्राळ अशा पूतनेचा वध केला, असा जगदीश्वर "अनिरुद्ध" श्रीकृष्ण यशोदामातेच्या हाती साध्याशा दोरखंडाने बांधला गेला.
भारतीय अध्यात्माने या कथेचा सूक्ष्मतर अन्वय लावला आहे. सर्वसाक्षी परमेश्वराने माणसाचे हे बंधन मानले, स्वीकारले आणि जणू हा संकेत दिला की प्रेमाचा अधिकार भगवंताला सर्वस्वी मान्य असून, तो केवळ त्या नाजूक बंधनातच बांधला जाऊ शकतो. या कथेमुळे श्रीकृष्णाला दामोदर हे नाव मिळाले आणि हा प्रसंग घडला तो कार्तिकातच, म्हणून कार्तिक मास हा कृष्ण भक्तांसाठी "दामोदर मास" ठरला. साहजिकच या महिन्यात मुकुंदाला प्रसन्न करण्यासाठी यथामति, यथाशक्ति प्रयत्न केले जातात. त्याची सखी असलेल्या राधेचीही आराधना केली जाते.
संपूर्ण भारतात, विशेषत: उत्तरेत, या काळात भगवद्भक्तीला बहर आलेला असतो. विविध प्रकारच्या पूजा, धार्मिक कार्यं, नेम-नियम, संपूर्ण महिनाभर सुरू राहतात. यांना कार्तिक व्रत असे म्हटले जाते. हे व्रत अनुसरताना कोणते नियम पाळावेत याचे उल्लेख कार्तिक पुराणात आहेत.
लवकर उठून स्नानादी कर्मे पार पाडावीत, ईशस्मरण करावे. अनेक ठिकाणी या महिन्यात काकडआरतीही केली जाते.
संपूर्ण शाकाहार पाळावा, अन्यथा ब्रह्महत्येचे (येथे ब्रह्म हे परब्रह्म या अर्थी अपेक्षित असावे - सर्वांभूती परमेश्वर/परब्रह्म या न्यायाने) पातक लागल्याचे मानले जाते.
एकभुक्त राहावे, दररोज शक्य नसल्यास किमान सोमवार, एकादशी, पौर्णिमा हे दिवस पाळावेत.
श्रीविष्णू समोर किंवा कृष्णासमोर दररोज तुपाचा दिवा लावावा.
श्रीविष्णूची परमभक्त असणाऱ्या लक्ष्मीला प्रिय असलेले कमळ किंवा मालतीपुष्पे वाहून पूजा करावी.
सायंकाळी दिवे उजळून तुळशीची पूजा करावी.
भगवंताच्या नामाचा होईल तितका जप करावा.
कार्तिक पुराणाचा एक अध्याय दररोज वाचावा. याचे फळ चारधाम यात्रा करण्याइतके आहे.
यथाशक्ति विविध प्रकारची दाने - अन्नदान, गोदान, दीपदान, इ. द्यावीत.
गंगास्नान अवश्य करावे.
दैनंदिन कार्याखेरीज कार्तिक सोमवार, कालाष्टमी, कुष्मांड नवमी, अक्षय नवमी, हरी बोधिनी किंवा प्रबोधिनी एकादशी, वैकुंठ चतुर्दशी, व्यास पूजा, कार्तिकी पौर्णिमा (जिला त्रिपुरी पौर्णिमा असेही संबोधले जाते), देव दिवाळी, तुलसी विवाह असे अनेक महत्त्वाचे दिवस कार्तिकात येतात. त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी शंकराने उन्मत्त अशा त्रिपुरासुराचा वध केला आणि त्याच्या जाचातून त्रैलोक्य मुक्त केले. मृत्यूसमयी त्रिपुरासुराच्या शरीरातून ज्योतिस्वरूप प्राण बाहेर पडला आणि शिव शंकरामध्ये विलीन झाला. त्याचं प्रतीक म्हणून या दिवशी दीपोत्सव साजरा केला जातो. अतिशय देखणा असा गंगा महोत्सव, आणि मनोरम असे गंगेतील दीपदानही याच महिन्यात पार पडते.
भक्त वात्सल्याने परिपूर्ण असा हा महिना भाविक मनासाठी क्षणोक्षणी पर्वणी साधणारा भासल्यास नवल नाही. या महिन्याचे विशेष म्हणजे, दिनचर्येपासून पुजाअर्चनेपर्यंत प्रत्येक कृतीला भगवंताचे अधिष्ठान जाणीवपूर्वक द्यावयाचे असल्याने, या सत्कर्मांचेही जीवाला बंधन होत नाही. त्यामुळे पुनर्जन्मासाठी बंधनकारक ठरणाऱ्या सर्व चांगल्या-वाईट कर्मांपासून मुक्ती देणारा हा महिना खरोखरीच "पुण्यानाम् परमम्  पुण्यम् पावनानाम् च पावनम्" आहे, यात शंका नाही.
----------
"मनोगत" वरचा हा माझा पहिला लेख. काकडा कार्तिकातच का, या प्रश्नाचे उत्तर देताना, या लेखाची कल्पना सुचली.

No comments: