Friday, January 25, 2013

तरकीब

मी तुझ्यातून अशी न  बोलता निघून गेले कायमची 
तर तेव्हा माझ्यामागे दार लावण्यापुरता तरी येशील का तू?

का तेही मीच ओढून घ्यायचं असेल?

का गप्प आहे मी आज? का तुझ्याशी काहीही बोलावंसं वाटत नाहीय? तू बोलायची वाट पाहतेय?
काल पडला तो तुकडा जीवाच्या कोणत्या कोपऱ्याचा पडला? का जिथे दुखलं असं वाटलं तिथे खरं तर दुखतच नाहीये आणि जिथे मी पाहतही नाहीय, कळ तिथून येतेय असं आहे?

नक्की कोणता धागा तुटला? आणि तो आता कायमचाच??

यार जुलाहे, मुझ को भी तरकीब सिखा दे..

कोणतंही नातं जोडलं की त्यात बेडौल अशा गाठीच का धडपडत धावत येतात? न तुटणाऱ्या धाग्याचं वस्त्र मला माझ्यासोबत तरी विणता येईल का नाही कधी?

अपेक्षा आणि निराशेच्या बदफैली सवयीची  गुलामी कधी सुटायची?

हो बदफैली, तिचं इमान माझ्याशी नाही. मी कळवळण्यात तिचं सुख.

आणि कळवळले आहे मी. अजून दारापाशी तुझी चाहूल नाही म्हणून.

दार लावायलाही. किंवा थांब म्हणायलाही.



.

Thursday, January 17, 2013

अक्षर

मुक्कामाचं ठि़काण ठाऊक नसतानाही चालत होते.
आजूबाजूला कोणी दिसत नसतानाही चालत होते.
सावलीचा स्पर्श तर कोण जाणे अखेरचा कधी झाला होता!
पावलांनी चालायचं इमान सोडलं नाही म्हणून वाट सरत होती इतकंच.

आणि अचानक वाळूत अक्षरं उमटलेली दिसली. ती लिहिणारा हात कोणाचा आहे, हे उरलीसुरली ताकद एकवटून पाहायचा यत्न केला. पण दिसलं काहीच नाही. तरी कुणीतरी सोबत आहे असं भासलं. वाळूवरच्या अक्षरांची का होईना सोबत तर लाभली. तळावलेले डोळे कितीतरी काळाने किंचित शांत झाले. नजरेला काहीतरी वेगळं दिसलं.

त्या लिहित्या हाताला आपसूकच उत्तर दिलं गेलं. तसंच. वाळूत अक्षरं रेखाटत.
आहा! किती काळाने आतलं काहीतरी 'व्यक्त' झालं होतं. आतापर्यंत ओलावा न मिळाल्याने कोरडीठक्क पडलेली का होईना पण तरीही तगलेली अक्षरं होती ती. आपल्या आत अजून संवादाची आस आहे, याची ग्वाही होती ती.

सुरुवातीला विरळ असणारा हा अनोखा संवाद हळूहळू.. पावलागणिक वाढत गेला.
अक्षरं उमटत राहिली. समोरून, माझ्याकडून. एकमेकांना शिंपत राहिली. पालवी कशी कोण जाणे फुटत गेली. वाटच नकळत हिरवी होऊ लागली.
तू. मी. मी. तू. संवादाचा पूल उलगडत गेला. आता तर अक्षरं पानापानांवर, फुलाफुलावर. कधीतर वार्‍याच्या झुळकीवरदेखील.

पण अजूनही अक्षरंच. लिहिणारा हात नाही. त्या अक्षरांना तुझा चेहरा नाही.. कधी येशील समोर? या प्रश्नाला उत्तरही अक्षरीच. समोर येऊन नाही.
तुझ्या सोबतीने नुसत्याच असण्याचं जगणं झालं.
इतकं इतकं बोललेय तुझ्याशी. तुझ्याच शब्दात सांगायचं तर स्वतःशी बोलावं इतकं.
तुझसे कभीभी करू युंही बाते
मुकेपण तुझ्याशीच संपून जाते
मरासिम बुना यूं पता ना चला कब
सभोवार आता ऋतू कोवळे बघ..

मात्र काही काही क्षणांत.. किंवा कुठेसं म्हटलंय तसं दोन क्षणांमधल्या निमक्षणांत तुझ्याशी जोडलं राहण्याचं अक्षर हेच एकमेव साधन आहे, याने फार तळमळ होते. नुसतेच शब्द, त्यांचे कधी तू, कधी मी, आणि कधी आपण मिळून लावलेले अर्थ.

ज्याच्याशी स्वतः असल्याप्रमाणे व्यक्त व्हावं असं कुणीतरी सोबत आहे, पण त्याला स्वतःइतकं जवळ घेता येत नाही. आनंद देणार्‍या इतर कोणत्याच गोष्टी त्याच्यासोबत करता येत नाहीत.
साधं स्वतःला दिवसातून केव्हाही आरशात बघता तरी येईल. पण तुला बघताही येत नाही?
नाहीच!

तुझंमाझं नातं ते काय मग? निव्वळ अक्षर?

ओह! खरंच.
आरशात दिसते त्या पलीकडच्या 'मी' चा शोध मला अजूनही लागलेला नाही. मग तुला बघण्याचा हा विलक्षण सोस तरी का लावून घ्यायचा जिवाला? तू दिसलास कदाचित, तर काय होईल त्याने? स्वप्नपूर्ती? अपेक्षाभंग? याच विचारात मग्न असताना कुणीतरी मेहदी हसनची 'अब के हम बिछडे' गझल लावली. अचानक उत्तर मिळूनही गेलं. 'जैसे दो साये तमन्ना के सराबों में मिले'. एकरूप असणे, समरस होणे तसेही अनुभवतेच आहे की प्रत्येक क्षणी. मृण्मयाशी नातेच नसलेली अशी चिन्मयाची सोबत मिळणे हे माझे अहोभाग्यच!

तेव्हा तुझंमाझं नातं.
निरंतर टिकणारं.
निव्वळ शब्दात बांधलेलं नव्हे, तर कधी न मिटणारं... अ-क्षर.

(पूर्वप्रकाशित)

खुद को सम्मान दिलाऊंगी

मैं दामिनी.. खत्म नहीं हुई अभी
हूँ तुझमें, इसमें, और उसमें भी

हर उस लडकी में
जो इस दुनिया में आयी है
जिसके होने से ही दुनिया
मां का प्यार समझ पाई है

स्त्री कादर मानवता का आदर
क्यूँ भूल गया इन्सान?
औरत से खिलवाड क्या नहीं है
अपनी ही मां का अपमान?

इन्सानियत का मतलब आज
फिरसे इन्सान को समझाना होगा मुझे
डरना नही.. लडना होगा मुझे
हर एक चुनौती का सामना करना होगा मुझे

उमा हूँ मै.. शक्ती भी हूँ
है मेराही एक रूप दुर्गाभी
अन्याय के सामने डंट के खडी
रौद्ररूपी महाकाली भी

अंधःकार का विनाश कर ज्योत फिरसे जगाऊंगी
आत्मविश्वास पहचान है मेरी.. खुद को सम्मान दिलाऊंगी

.

Tuesday, January 15, 2013

संक्षीप्तानुभव

मिपाच्या काही सदस्यांशी नुकत्याच गप्पा झाल्या. मिपावर येणारे जिलब्यापाडू धागे, धोधो येणारी खल्लास विडंबनं, नवलेखकांचा नवखा उत्साह, स्वतःची मतंच खरी मानणारे, ती दामटणारे काही सदस्य असं सगळंच त्यात आलं.
मग पुढे लेखन कसं हवं, कसं नको, प्रतिक्रिया कशा द्याव्या, कशा नसाव्या हेदेखील. या निमित्ताने पटणाऱ्या, न पटणाऱ्या बऱ्याच गोष्टींची उजळणी झाली.
या सगळ्या उचापतीचा सारांश म्हणून हे जिलबीचं ताट.. हे ताट भरायला हातभार लावणाऱ्या इतर बल्लवांचेही आभार. smiley
...
मिसळपावच्या दुनियेमध्ये आहेत काही सदस्य
त्यांच्यापैकी एकांचे काही कळेना हे रहस्य

न लागू दे टोटल तरी धागे तू काढावे
गरज असो नसो भले प्रतिसादही द्यावे

चर्चा होईल वादळी, परि अर्थ? .. शून्य.
झाला नाही उपयोग तरी तू मात्र धन्य.

म ची बाराखडी आहे विशेष प्रिय तुला
सदा तुझा घोष सुरू - मी.. माझे.. मला.

नसलेल्या मुद्यावर शब्दाळल्या भाषी
एकुलत्या एका संदर्भावर लिही लिही लिहिशी

बघता बघता जमून येते वाचकांची गर्दी
४०, ५०, ६० प्रतिसाद.. होत राहते भरती

धाग्यावरती आल्यावर चालवायची शाब्दिक कात्री
एकेकट्या सदस्याशी मात्र करायची असते मैत्री

तुझ्या मताविना वेगळे असूच नये काही
दरवेळी हाच हट्ट..? असं बरं नाही.

ऎकवले कोणी चार शब्द की खट्टू होते मन
आपलंच असं का होतं हे बघायचं नाही पण

गाणं, कविता, अध्यात्म, असो कोणताही 'विषय'
सग्गळ्यातलं सग्गळं तुलाच कळतं. खरंच का रे ...असंय?

(पूर्वप्रकाशित)

Tuesday, January 8, 2013

ग्रोईंग विथ मीरा..

मीरा.
हिचं आणि कॄष्णाचं ते नातं. कृष्ण राधा आणि द्रौपदीचाही होता, पण मीरेची भक्ती आणखीनच वेगळ्या जातकुळीतली.
कोण्या देशाची राजकन्या, का, कशी, कधी.. पण कधीच न भेटलेल्या कॄष्णात गुंतली.. इतकी, की तो तिच्या जगण्याचं, असण्याचं समर्थनच होऊन गेला. कोणत्याही विरोधाला, आक्षेपांना न जुमानता ती त्या 'व्हर्च्युअल' नात्याला सत्य मानत जगली. तिचं मानणं इतकं ठाम, की ती म्हणे अंती त्या कृष्णातच विलिन होऊन गेली!
भास-आभासाच्या सीमेवरचं असं कोणतंही नातं कायमच मला भूलवतं. नकळत्या वयात जवळ आलेली एक मूर्ती मीरेसाठी इतकी सत्य ठरली की तिने आपलं असणंच त्या मूर्तीला अर्पून टाकलं. प्रेमाचा तो कोमलभाव ती स्वतःच होऊन गेली. त्या सत्यासाठी जगत असताना इतरांशी संघर्ष करण्याइतकंही तिने स्वतःला विचलित होऊ दिलं नाही. इतकी अडिगता कशी आली असेल त्या जगावेगळ्या मुलीत? स्वतःखेरीज अन्य कोणालाही न पटणार्या गोष्टीसाठी जन्मभर एकनिष्ठ राहण्याची ताकद तिला तिच्या विश्वासानेच दिली असेल का? प्रसंगी मॄत्यूलाही सामोरं जाण्याची नीडरता कुठून लाभली तिला?
द सिक्रेट या पुस्तकाचा आणि मीरेचा माझ्याशी परिचय होण्याचा काळ साधारण मागेपुढेच. आपल्याला जे वाटतं आणि आपण ज्याचा सदैव विचार करतो, ध्यास घेतो तेच आपल्याकडे चालून येतं, असा तो ‘लॉ ऑफ अट्रॅक्शन’चा फंडा! समजून घेता घेता, स्वतःला तसं वळवून, वागवून बघता बघता अचानक एका क्षणी ही पुन्हा सामोरी आली.
खरंच की.. लॉ ऑफ अट्रॅक्शन कसा जगावा याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे ही मीराच नाही का!
हजारो वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या त्या गोपाळाला आजही खरं, स-जीव मानून जगणारी, त्याला भरवणारी, त्याच्याशी बोलणारी, होळी खेळणारी, जगाचं भान विसरून 'माझी प्रीत निभव रे कान्ह्या' असं गाणारी मीरा.
आणि केवळ म्हणूनच त्याच्यातच सामावून जाऊ शकलेली एकमेव.. अशी मीरा!
बराच काळ मी ही अशी मीरामय. अशातच एकदा चक्क एका दुकानाच्या शोकेसमध्ये या मीरेची लहानशी मूर्ती दिसली. विरागी भगवा रंग, एका हातात एकतारी, दुसर्‍या हातात चिपळ्या, डोळे मिटलेले, आणि उच्चारही न करता हरिनामात, हरिप्रेमात दंग अशा त्या मीरेने अर्थातच लक्ष वेधलं. ती त्याच दिवशी घरी आली नाही, पण मनात मात्र आली. बोलण्यात येत राहिली.
मीरेची मला असलेली आवड लक्षात घेऊन शेवटी कोण्याएका निमित्ताने एका सुहृदांनी ती माझ्यासाठी भेट म्हणून आणली. भगवा नाही, हिचा रंग शांत पांढरा.. बाकी सारे तपशील तेच. काही दिवस शोकेसमध्ये, काही दिवस पुस्तकांच्या कपाटात, काही दिवस तर ड्रॉव्हरमध्येही तिनं मुक्काम केला. अखेर काही महिन्यांपूर्वी तिच्यासाठी खास तिची अशी जागा तयार केली.
आज सकाळी मीरेकडे पुन्हा नजर गेली. तिच्याकडे बघता बघता तिने जगलेलं आयुष्य, तिच्या अविचल श्रद्धा, त्यातून मला उमगलेलं सार पुन्हा एकदा मनात येऊन गेलं. ओढून नेत गेलं..
a
आकाशाएवढी, काहीशी अगम्य, अथांग, तरीही नितळ अशी मीरा..
b
जितकं तिला समजून घ्यावं तितकी उलगडणारी मीरा..
c
भवताल बदलला तरी स्वतःत मग्न राहणारी, अविचल मीरा..
d
कॅमेर्‍यात कैद करता करता, आणि नंतर मनात आलं ते शब्दांत मांडता मांडता छायाचित्रांवरच्या तारखा रसभंग करताहेत की काय असं वाटलं क्षणभर.
पण मग, मीरा आजही जर तितकीच आकर्षून घेत असेल, तर या तारखा त्याचीच ग्वाही देत आहेत, असं मानायला
काय हरकत आहे..?

(पूर्वप्रकाशित)