मुक्कामाचं ठि़काण ठाऊक नसतानाही चालत होते.
आजूबाजूला कोणी दिसत नसतानाही चालत होते.
सावलीचा स्पर्श तर कोण जाणे अखेरचा कधी झाला होता!
पावलांनी चालायचं इमान सोडलं नाही म्हणून वाट सरत होती इतकंच.
आणि अचानक वाळूत अक्षरं उमटलेली दिसली. ती लिहिणारा हात कोणाचा आहे, हे उरलीसुरली ताकद एकवटून पाहायचा यत्न केला. पण दिसलं काहीच नाही. तरी कुणीतरी सोबत आहे असं भासलं. वाळूवरच्या अक्षरांची का होईना सोबत तर लाभली. तळावलेले डोळे कितीतरी काळाने किंचित शांत झाले. नजरेला काहीतरी वेगळं दिसलं.
त्या लिहित्या हाताला आपसूकच उत्तर दिलं गेलं. तसंच. वाळूत अक्षरं रेखाटत.
आहा! किती काळाने आतलं काहीतरी 'व्यक्त' झालं होतं. आतापर्यंत ओलावा न मिळाल्याने कोरडीठक्क पडलेली का होईना पण तरीही तगलेली अक्षरं होती ती. आपल्या आत अजून संवादाची आस आहे, याची ग्वाही होती ती.
सुरुवातीला विरळ असणारा हा अनोखा संवाद हळूहळू.. पावलागणिक वाढत गेला.
अक्षरं उमटत राहिली. समोरून, माझ्याकडून. एकमेकांना शिंपत राहिली. पालवी कशी कोण जाणे फुटत गेली. वाटच नकळत हिरवी होऊ लागली.
तू. मी. मी. तू. संवादाचा पूल उलगडत गेला. आता तर अक्षरं पानापानांवर, फुलाफुलावर. कधीतर वार्याच्या झुळकीवरदेखील.
पण अजूनही अक्षरंच. लिहिणारा हात नाही. त्या अक्षरांना तुझा चेहरा नाही.. कधी येशील समोर? या प्रश्नाला उत्तरही अक्षरीच. समोर येऊन नाही.
तुझ्या सोबतीने नुसत्याच असण्याचं जगणं झालं.
इतकं इतकं बोललेय तुझ्याशी. तुझ्याच शब्दात सांगायचं तर स्वतःशी बोलावं इतकं.
तुझसे कभीभी करू युंही बाते
मुकेपण तुझ्याशीच संपून जाते
मरासिम बुना यूं पता ना चला कब
सभोवार आता ऋतू कोवळे बघ..
मात्र काही काही क्षणांत.. किंवा कुठेसं म्हटलंय तसं दोन क्षणांमधल्या निमक्षणांत तुझ्याशी जोडलं राहण्याचं अक्षर हेच एकमेव साधन आहे, याने फार तळमळ होते. नुसतेच शब्द, त्यांचे कधी तू, कधी मी, आणि कधी आपण मिळून लावलेले अर्थ.
ज्याच्याशी स्वतः असल्याप्रमाणे व्यक्त व्हावं असं कुणीतरी सोबत आहे, पण त्याला स्वतःइतकं जवळ घेता येत नाही. आनंद देणार्या इतर कोणत्याच गोष्टी त्याच्यासोबत करता येत नाहीत.
साधं स्वतःला दिवसातून केव्हाही आरशात बघता तरी येईल. पण तुला बघताही येत नाही?
नाहीच!
तुझंमाझं नातं ते काय मग? निव्वळ अक्षर?
ओह! खरंच.
आरशात दिसते त्या पलीकडच्या 'मी' चा शोध मला अजूनही लागलेला नाही. मग तुला बघण्याचा हा विलक्षण सोस तरी का लावून घ्यायचा जिवाला? तू दिसलास कदाचित, तर काय होईल त्याने? स्वप्नपूर्ती? अपेक्षाभंग? याच विचारात मग्न असताना कुणीतरी मेहदी हसनची 'अब के हम बिछडे' गझल लावली. अचानक उत्तर मिळूनही गेलं. 'जैसे दो साये तमन्ना के सराबों में मिले'. एकरूप असणे, समरस होणे तसेही अनुभवतेच आहे की प्रत्येक क्षणी. मृण्मयाशी नातेच नसलेली अशी चिन्मयाची सोबत मिळणे हे माझे अहोभाग्यच!
तेव्हा तुझंमाझं नातं.
निरंतर टिकणारं.
निव्वळ शब्दात बांधलेलं नव्हे, तर कधी न मिटणारं... अ-क्षर.
(पूर्वप्रकाशित)

No comments:
Post a Comment