Tuesday, January 8, 2013

ग्रोईंग विथ मीरा..

मीरा.
हिचं आणि कॄष्णाचं ते नातं. कृष्ण राधा आणि द्रौपदीचाही होता, पण मीरेची भक्ती आणखीनच वेगळ्या जातकुळीतली.
कोण्या देशाची राजकन्या, का, कशी, कधी.. पण कधीच न भेटलेल्या कॄष्णात गुंतली.. इतकी, की तो तिच्या जगण्याचं, असण्याचं समर्थनच होऊन गेला. कोणत्याही विरोधाला, आक्षेपांना न जुमानता ती त्या 'व्हर्च्युअल' नात्याला सत्य मानत जगली. तिचं मानणं इतकं ठाम, की ती म्हणे अंती त्या कृष्णातच विलिन होऊन गेली!
भास-आभासाच्या सीमेवरचं असं कोणतंही नातं कायमच मला भूलवतं. नकळत्या वयात जवळ आलेली एक मूर्ती मीरेसाठी इतकी सत्य ठरली की तिने आपलं असणंच त्या मूर्तीला अर्पून टाकलं. प्रेमाचा तो कोमलभाव ती स्वतःच होऊन गेली. त्या सत्यासाठी जगत असताना इतरांशी संघर्ष करण्याइतकंही तिने स्वतःला विचलित होऊ दिलं नाही. इतकी अडिगता कशी आली असेल त्या जगावेगळ्या मुलीत? स्वतःखेरीज अन्य कोणालाही न पटणार्या गोष्टीसाठी जन्मभर एकनिष्ठ राहण्याची ताकद तिला तिच्या विश्वासानेच दिली असेल का? प्रसंगी मॄत्यूलाही सामोरं जाण्याची नीडरता कुठून लाभली तिला?
द सिक्रेट या पुस्तकाचा आणि मीरेचा माझ्याशी परिचय होण्याचा काळ साधारण मागेपुढेच. आपल्याला जे वाटतं आणि आपण ज्याचा सदैव विचार करतो, ध्यास घेतो तेच आपल्याकडे चालून येतं, असा तो ‘लॉ ऑफ अट्रॅक्शन’चा फंडा! समजून घेता घेता, स्वतःला तसं वळवून, वागवून बघता बघता अचानक एका क्षणी ही पुन्हा सामोरी आली.
खरंच की.. लॉ ऑफ अट्रॅक्शन कसा जगावा याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे ही मीराच नाही का!
हजारो वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या त्या गोपाळाला आजही खरं, स-जीव मानून जगणारी, त्याला भरवणारी, त्याच्याशी बोलणारी, होळी खेळणारी, जगाचं भान विसरून 'माझी प्रीत निभव रे कान्ह्या' असं गाणारी मीरा.
आणि केवळ म्हणूनच त्याच्यातच सामावून जाऊ शकलेली एकमेव.. अशी मीरा!
बराच काळ मी ही अशी मीरामय. अशातच एकदा चक्क एका दुकानाच्या शोकेसमध्ये या मीरेची लहानशी मूर्ती दिसली. विरागी भगवा रंग, एका हातात एकतारी, दुसर्‍या हातात चिपळ्या, डोळे मिटलेले, आणि उच्चारही न करता हरिनामात, हरिप्रेमात दंग अशा त्या मीरेने अर्थातच लक्ष वेधलं. ती त्याच दिवशी घरी आली नाही, पण मनात मात्र आली. बोलण्यात येत राहिली.
मीरेची मला असलेली आवड लक्षात घेऊन शेवटी कोण्याएका निमित्ताने एका सुहृदांनी ती माझ्यासाठी भेट म्हणून आणली. भगवा नाही, हिचा रंग शांत पांढरा.. बाकी सारे तपशील तेच. काही दिवस शोकेसमध्ये, काही दिवस पुस्तकांच्या कपाटात, काही दिवस तर ड्रॉव्हरमध्येही तिनं मुक्काम केला. अखेर काही महिन्यांपूर्वी तिच्यासाठी खास तिची अशी जागा तयार केली.
आज सकाळी मीरेकडे पुन्हा नजर गेली. तिच्याकडे बघता बघता तिने जगलेलं आयुष्य, तिच्या अविचल श्रद्धा, त्यातून मला उमगलेलं सार पुन्हा एकदा मनात येऊन गेलं. ओढून नेत गेलं..
a
आकाशाएवढी, काहीशी अगम्य, अथांग, तरीही नितळ अशी मीरा..
b
जितकं तिला समजून घ्यावं तितकी उलगडणारी मीरा..
c
भवताल बदलला तरी स्वतःत मग्न राहणारी, अविचल मीरा..
d
कॅमेर्‍यात कैद करता करता, आणि नंतर मनात आलं ते शब्दांत मांडता मांडता छायाचित्रांवरच्या तारखा रसभंग करताहेत की काय असं वाटलं क्षणभर.
पण मग, मीरा आजही जर तितकीच आकर्षून घेत असेल, तर या तारखा त्याचीच ग्वाही देत आहेत, असं मानायला
काय हरकत आहे..?

(पूर्वप्रकाशित)

No comments: